नव्या वर्षात हेरिटेज पालिका मुख्यालयाची पर्यटन सफर, 150 वर्षांच्या इमारतीचा ऐतिहासिक वारसा उलगडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा कारभार हाकणाऱया महानगरपालिका मुख्यालयाच्या हेरिटेज इमारतीची पर्यटन सफर जानेवारीपासून सर्वसामान्यांना करता येणार आहे. यामुळे 150 वर्षांच्या आणि गॉथिक शैलीतील इमारतीचा ऐतिहासिक वारसा उलगडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यालयात येऊन पूर्वतयारीचा आढावा घेतल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाची हेरिटेज इमारत केवळ मुंबईकरांनाच नव्हे, तर देश-विदेशातील पर्यटक-सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिली आहे. त्यामुळे या वास्तूचे पर्यटन घडावे यासाठी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार ऑक्टोबरमध्ये करण्यात आला आहे. त्यादृष्टीने ही इमारत पर्यटनासाठी खुली करण्याच्या दृष्टीने पालिकेच्या माध्यमातून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला.

मुंबई महानगरपालिकेची चार मजल्यांची मुख्यालयाची इमारत गॉथिक शैलीतील दगडीकामातून तयार करण्यात आलेली आहे. गॉथिक शैलीतील हे काम जागतिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये मोडते. या इमारतीबरोबरच पालिकेची
सहा मजली  विस्तारित इमारतही आहे.

गाईडसोबत घेता येणार ‘हेरिटेज वॉक’

ही इमारत पर्यटनासाठी खुली झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर गाईडच्या मदतीने पर्यटकांना पाहता येणार आहे. यावेळी पर्यटकांना गार्डडच्या माध्यमातून इमारतीचा इतिहास, आताचे महत्त्व सांगितले जाईल. ही सफर मोफत राहणार असल्याचे सामंजस्य करारात म्हटले स्पष्ट करण्यात आले आहे.

वास्तूत काय पाहता येणार

मुख्यालयाच्या इमारतीत पालिका आयुक्तांचे कार्यालय असून विविध महत्त्वाच्या समित्यांची सभागृहे आहेत. यात मुंबईतील 232 नगरसेवकांसाठी असलेले मुख्य सभागृह, त्यातील महापुरुषांचे पुतळे, स्थायी समिती, शिक्षण समितीचे सभागृह आहे. हेरिटेज वास्तू असल्यामुळे महापौर तसेच पालिका आयुक्तांच्या दालनांसह अनेक प्रशस्त दालने आहेत. आधुनिकतेचा साज म्हणून इमारतीत लिफ्ट आणि वातानुपूलित यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र, वास्तूच्या कोणत्याही रचनेत बदल न करता ही वास्तू जपण्यात आली आहे. इमारतीसमोर फिरोजशहा मेहता यांचा पुतळा आहे, तर समोरच सेल्फी पॉईंट आहे.