
सोशल साईटवर अनोळखी लोकांशी मैत्री करणे ही काही नवीन गोष्ट नाही आणि त्यात काही वावगंही नाही. पण अनोळखी लोकांशी मैत्री करताना जरा जपून… एका 33 वर्षाच्या तरुणाला सोशल साईटवरची मैत्री चांगलीच अंगाशी आली आहे.
मुंबईतील रेडिओ वाहिनीमध्ये काम करणाऱ्या 33 वर्षाच्या या कर्मचाऱ्याला 9 डिसेंबर रोजी सोशल साईटवरून नेहा शर्मा नावाच्या एका महिलेची फ्रेण्ड रिक्वेस्ट आली. त्यानेही रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. एकमेकांशी चॅट करायला लागले. नंतर त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेऊन वॉट्सअॅपवर चॅटींग सुरू केली. काही दिवसाने त्या महिलेने त्यावा व्हिडीओ कॉल बोलूयात असे सांगितले. पण तरूणाने त्या मेसेजला काही उत्तर देण्याआधीच तिने व्हिडीओ कॉल केला आणि कपडे उतरवायला सुरूवात केली. तिला तसे पाहून त्या तरूणाने व्हिडीओ कॉल कट केला. पण त्यानंतरही सातत्याने ती त्याला फोन करत होती. नंतर तिने पुन्हा त्याला कॉल केला आणि त्याला कपडे उतरवायला सांगितले. घाबरून त्याने त्याचे कपडे उतरले पण तो व्हिडीओ तिने रेकॉर्ड केला आणि त्याला त्याची क्लिप पाठवली.
नेहाने पाठवलेल्या क्लिपमध्ये तो तरूण स्वत:चे कपडे उतरवताना दिसत होता. व्हिडीओ पाहून त्याच्या पायखालची जमीनच सरकली. त्या महिलेने व्हिडीओ डिलीट करण्यासाठी त्याच्याकडे 35,000 रूपयांची मागणी केली. एवढ्यावरच न थांबता तिने त्याचे मित्रमैत्रीणी आणि नातेवाईकांना तो व्हिडीओ पाठवण्याची धमकी दिली. पण त्याचे काहीच उत्तर न आल्याने त्या महिलेने तो व्हिडीओ त्याच्या बहिणीला आणि काका-काकींना पाठवला. त्यानंतर तिने पुन्हा फोन करून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने घाबरून तिने पाठवलेल्या अकाऊंट नंबरवर 1500 पाठवले आणि एवढीच रक्कम अकाऊंटमध्ये असल्याचे सांगितले. पण त्यानंतर तिने पुन्हा फोन करून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. पण हे वाटतं तितक सोपं प्रकरण दिसत नसल्याने अखेर त्या तरूणाने आग्रीपाडा पोलिस स्थानकात तिच्याविरूद्ध बदनामी केल्याची आणि खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली.





























































