पोलीस कोठडीतून पळालेल्या माजी आमदाराच्या 2 वर्षांनी मुसक्या आवळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलिसांच्या तावडीतून पळालेल्या माजी आमदाराच्या 2 वर्षांनी मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रामबीर शोकीन असं या माजी आमदाराचं नाव आहे. शोकीन याला बागपत पोलिस अधिका-यांनी अटक केली आहे. 2016 साली शोकीन याला मकोका अंतर्गत अटक करण्यात आली होती. शोकीन हा कुख्यात गँगस्टर नीरज बवाना याचा काका आहे.

शोकीन याला खंडणीखोरी आणि जबरी चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयाकडून शोकीन याने उपचारासाठी परवानगी घेतल्यानंतर त्याला 26 सप्टेंबर 2018 रोजी सफदरजंग रुग्णालयात नेण्याची न्यायालयाने परवानगी दिली होती. रुग्णालयात पोहचल्यानंतर पोलिसांना तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की डॉक्टर हे एका शस्त्रक्रियेत व्यस्त असल्याने त्यांना थोडं थांबावं लागेल.  याच परिस्थितीचा फायदा उचलत शोकीन रुग्णालयातून फरार झाला होता.

शोकीन याला रुग्णालयातून पळवून नेण्यासाठी त्यांची बायको रिता सिंग ही दोन मोठ्या गाड्या घेऊन तयार होती.  रिता हिच्यासोबत शोकीन यांचे सहकारीही होते.  शोकीन याने त्याला रुग्णालयात नेण्यासाठी आलेल्या पोलिसांना ‘ माझ्या घरी जेवण करू, मला काही कागदपत्रेही घरून घ्यायची आहेत’ असं सांगितलं होतं. शोकीन यांच्या साथीदाराने पोलिसांना त्याच्या देवली इथल्या घरी नेण्यासाठी टॅक्सी मागवली होती. पोलीस जेव्हा शोकीन यांच्या घरी पोहोचले तेव्हा ते घरी आलेच नसल्याचं पोलिसांना कळालं. सतर्क झालेल्या पोलिसांनी शोकीन याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत तो फरार झाला होता.

अटकेनंतर शोकीन याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितलं की रुग्णालयातून तो त्याच्या नातेवाईकांच्या घरी जाऊन लपला होता. या नातेवाईकांच्या मदतीने त्याने दुसरी कार शोधली जिच्याद्वारे तो राजस्थानमधील दौसा भागातल्या मेहंदीपूर बालाजी मंदिराच्या दिशेने पळून गेला होता. तिथून तो हिमाचल प्रदेशला पळून गेला होता. 6 महिन्यांपूर्वी शोकीन दिल्लीला आला होता. तो दिल्लीतल्या कमरुद्दीन नगर भागात ओळख लपवून राहात होता.