
सध्या कोरोनामुळे अवघं जग वेठीला धरलं गेलं आहे. लॉकडाऊन उघडल्यानंतर रोजचे व्यवहार हळूहळू रुळावर येत आहेत. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी सोशल डिस्टन्सिंग पाळणं बंधनकारक आहे. पण, त्यातही एका शाळकरी मुलाने शाळेच्या बाथरूममध्ये डीजे पार्टी केली आहे.
ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. सोशल मीडियावर या पार्टीचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या मुलाचं नाव साएल बेल असं आहे. साएलने त्याच्या शाळेच्या बाथरूममध्ये डीजे पार्टी केली.
साएलला भविष्यात डिस्क जॉकी अर्थात डीजे व्हायचं आहे. कोरोना काळानंतर त्याने पार्टी करायचं निश्चित केलं होतं. पण, ती करण्यासाठी त्याने भलतीच जागा निवडली.
त्याने त्याच्या शाळेच्या बाथरूमला पार्टीसारखी सजावट केली. लाईट्स लावले, टीव्ही आणि म्युझिक सिस्टिमचीही व्यवस्था केली. इतक्यावरच न थांबता त्यात तो स्वतः डीजे बनला. आठवीच्या विद्यार्थ्यांना पार्टीचं आमंत्रणही पाठवलं.
पण, ही पार्टी काही जास्त वेळ चालली नाही. कारण, त्यांच्या शिक्षकांना या पार्टीचा सुगावा लागला आणि त्यांनी ताबडतोब पार्टी बंद केली. साएल बेल या मुलाची आई ल्युइस बेल हिला जेव्हा आपल्या मुलाचे प्रताप समजले, तेव्हा तिला हसावं की रडावं ते कळेना. पण, साएलच्या या प्रयत्नांचं तिने कौतुक केलं.
साएलने कुणालाही नुकसान व्हावं या हेतूने पार्टी केली नव्हती. त्यामुळे शाळेच्या प्रशासनानेही त्याच्याविरुद्ध कोणतीही कडक कारवाई केली नाही. पण, या पार्टीचे व्हिडीओ ल्युईस यांनी सोशल मीडियावर शेअर केले आणि नेटकऱ्यांची या कल्पनेने हसून पुरेवाट झाली.
Posted by Louise Bell on Wednesday, 16 December 2020



























































