
23 सप्टेंबर रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. सर्व रस्ते, गल्ल्या पाण्याने भरल्या. परळचे दामोदर नाटय़गृह बुडाले. असे कधीच घडले नव्हते. कित्येक उन्हाळे, पावसाळे पाहिलेल्या दामोदरने मात्र असाही पाऊस पाहिला आणि सर्व नाटय़ प्रेमी हळहळले. पण आता त्याच दामोदरमध्ये पुन्हा एकदा तिसरी घंटा वाजणार असून शुक्रवारी लाँग लाइफ नाटकाचा शुभारंभ होणार आहे.
दामोदर नाटय़गृहाचे व्यवस्थापन सोशल सर्व्हिस लीग या संस्थेच्या मालकीचे आहे. नाटय़गृह पावसात बुडाल्याने रंगमंच आणि प्रेक्षागृहातील खुर्च्यांचे अतोनात नुकसान झाले. पाऊस ओसरल्यानंतर साफसफाई करणे, पुन्हा एकदा हे नाटय़गृह रसिकांच्या आणि कलावतांच्या स्वागतासाठी सज्ज ठेवणे हे कठीण काम होते. मात्र अध्यक्ष आनंद माईणकर, उपाध्यक्ष विजय वर्टी आणि सचिव चंद्रकांत कोपडे यांनी अपार मेहनत घेऊन दामोदरचे दार पुन्हा एकदा रसिकांसाठी उघडले आहे.
नाटय़क्षेत्रातील ज्येष्ठ व्यस्थापक हरी पाटणकर, नाटय़गृहाचे व्यवस्थापक बाबू राणे, पाटील यांनी शोधकाम सुरू केले आणि लाँग लाईफ हे नाटक हाताला लागले. शुक्रवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता या नाटकाचा शुभारंभ दामोदरमध्ये होणार आहे. नाटय़ रसिकांसाठी ही खरेतर आनंदाचीच बातमी आहे.
दीनानाथचा पडदा उद्या उघडणार
विलेपार्ले येथील दीनानाथ नाटय़गृहाचा पडदाही गुरुवार 24 डिसेंबरला उघडणार आहे. स्वरगंधार, जीवनगाणी आणि आमदार पराग अळवणी यांच्या प्रयत्याने लॉकडाऊननंतरचा पहिला स्वरसोहळा रात्री 8.30 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्यात प्रशांत लळीत, विनीत गोरे, सोनाली कर्णिक, अर्चना गोरे, स्मिता गवाणकर, नचिकेत देसाई, जय आजगांवकर आदी कलावंत मंडळी सहभागी होणार आहेत.





















































