
शहरात लागू असलेल्या संचारबंदीमुळे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. संचारबंदी ही मुंबईकरांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षिततेसाठी आहे. संचारबंदीत पाचपेक्षा अधिक लोक जमल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे मुंबई पोलीस दलाचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहेत. अजून कोरोनाचा धोका टळलेला नाही. नुकताच यू.के.त कोरोना विषाणूचा नवा प्रकार समोर आल्यावर राज्य सरकारने त्याची दखल घेतली. रात्री 11 ते पहाटे 6 या वेळात संचारबंदीचा आदेश काढला. या संचारबंदीबाबत मुंबईकरांच्या मनात अनेक शंका आहेत. त्या शंकांचे निरसरण आज सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. संचारबंदी ही नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आहे.
रात्री 11 ते पहाटे 6 या काळात पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. रात्रपाळीची कार्यालये वगळता पब्ज, हॉटेल्स, सिनेमागृहे अशी आस्थापने 11 वाजता बंद करणे बंधनकारक आहे. संचारबंदीत वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. या काळात नागरिक एकटेदुकटे घराबाहेर पडू शकतील. मोटरसायकल आणि चारचाकी वाहनाने प्रवास करता येईल. वाहनाने प्रवास करताना चारपेक्षा अधिक जण नसावेत. नाकाबंदी दरम्यान मुंबईकरांना कोणताही त्रास होणार नाही, असे नागरे-पाटील यांनी सांगितले. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, ते निर्बंध सर्वांसाठी फायद्याचे आहेत. पहाटे मार्ंनग वॉकला किंवा रात्री कामानिमित्त घराबाहेर जायचे असल्यास त्यावर बंधने नसणार आहेत.































































