सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडण्याचे नव्याने टेंडर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर चिमणीचे काम पाडण्यास नाशिकच्या कंत्राटदाराने नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेने नव्याने निविदा जाहीर केली आहे. 8 जानेवारीला ही निविदा उघडण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाने सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे. महापालिकेने 2016 मध्ये नाशिकच्या मिहान कंपनीला पाडण्याचे काम दिले होते. जून 2016 मध्ये कार्यवाही सुरू झाली होती. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पाडकामाला अभय दिले. त्यानंतर या प्रकरणात पुन्हा चालढकल झाली. कंत्राटदाराने नुकसान झाल्याचा दावाही केला होता. सोलापुरातून विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी ऑगस्ट 2020 पासून सोलापूर विकास मंचने पाठपुरावा सुरू केला आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीही चिमणीचे पाडकाम करण्याची तयारी दाखवली आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही पाडकामाला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतर महापालिकेने मिहान कंपनीशी संपर्क साधला. मिहान कंपनीने या कामासाठी जादा पैसे मागितल्याने महापालिकेने नव्याने निविदा काढण्याचा निर्णय घेतला. निविदा दाखल करण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी असून, 8 जानेवारीला निविदा उघडण्यात येणार आहे.

सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी चिमणी पाडकामासाठी पाठपुरावा सुरू केल्यानंतर आयुक्त पी. शिवशंकर यांनी कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी शब्द पाळला आहे. आता जानेवारी महिन्यात कंत्राटदार नेमून पाडकामाला तत्काळ सुरुवात करावी. सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्याचा अडथळा दूर करावा, असे सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा यांनी सांगितले.