कश्मीरमध्ये गुपकर आघाडीची जोरदार मुसंडी, 20 पैकी 13 जिल्ह्यात दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरातील जिल्हा विकास परिषदांच्या (डीडीसी) निवडणुकांमध्ये फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील गुपकर आघाडीने जोरदार मुसंडी मारली. काँग्रेससह एकूण सात पक्षांच्या या आघाडीने 20 पैकी 13 जिह्यांमध्ये 110 हून अधिक जागांवर दणदणीत विजय मिळवला. कलम 370 हटवल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

20 जिह्यांतील प्रत्येकी 14 जागा म्हणजेच एकूण 280 जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. यापैकी 244 जागांचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यातील 110 हून अधिक जागांवर गुपकर आघाडीने बाजी मारली. यात नॅशनल कॉन्फरन्सला 66 जागांवर यश मिळाले. तसेच अपक्ष उमेदवारांनी 49, पीडीपी-26, काँग्रेस 25, तर अपनी पार्टीने 12 जागांवर आपला झेंडा फडकावला. कश्मीर खोऱयात गुपकर आघाडीने सर्वाधिक 72 जागा जिंकल्या, तर भाजपने तीन जागांवरील विजयाने आपले खाते खोलले.

जम्मूमध्ये भाजपला यश

गुपकर आघाडीने कश्मीर खोऱयात अपेक्षेनुसार सर्वाधिक जागा मिळवल्या, मात्र जम्मूमध्ये भाजपने जबरदस्त यश मिळवले. येथील निवडणुकांमध्ये भाजपने एकटय़ाने 71 जागा जिंकल्या, तर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने मिळून 45 जागांवर विजय मिळवला. यातून जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या व्हिजनवर विश्वास असल्याचे सिद्ध होते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी निकालानंतर दिली.

2015 मध्ये आम्ही सैतानाशी युती केली होती – मेहबुबा मुफ्ती

जम्मू-कश्मीरात 2015 मध्ये पीडीपी आणि भाजपचे संयुक्त सरकार सत्तेवर आले होते. त्यावर माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. आम्ही सैतानासोबत युती केली होती. भाजपने तेव्हा सर्व अटी मान्य केल्या होत्या. जेव्हा सरकार कोसळले तेव्हा त्यांनी तेच केले, जे त्यांनी ठरवले होते, असे त्या म्हणाल्या. जोपर्यंत कलम 370 पुन्हा लागू होत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढवणार नाही, असा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.