
अमेरिकेचे पत्रकार डॅनिअल पर्ल यांची हत्या करणाऱ्या दहशतवादी अहमद उमर शेख, पहाद नसीम, सईद सलमान साकीब आणि शेख मोहम्मद आदिल यांची तत्काळ सुटका करण्याचे सिंध उच्च न्यायालयाने दिले आहेत. पर्ल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे पत्रकार होते. त्यांच्या हत्येप्रकरणी सुनावणी करताना सिंध उच्च न्यायालयाने आरोपींना तुरुंगात ठेवणं बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.
ज्या आरोपींची न्यायालयाने सुटका केली आहे त्यातील उमर शेख याची 1999 साली कंदहार येथे अपहरण करून नेण्यात आलेले विमान सोडण्याच्या बदल्यात हिंदुस्थानने सुटका केली होती. पर्ल यांच्या हत्येप्रकरणी उमर शेख याची सुटका करणं ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयची खेळी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सुटका करण्यात आलेल्या आरोपींनी 18 वर्ष तुरुंगात घालवली आहेत. या आरोपींनी उच्च न्यायालयात एक अपील दाखल केलं होतं. या अपीलावर सुनावणी करताना न्यायालयाने उमर शेख, साकीब आणि नसीम यांची सुटका केली. न्यायालयाने शेख याला आधी फाशीची शिक्षा सुनावली होती, मात्र नंतर ती फक्त 7 वर्षांच्या शिक्षेत बदलली होती. शेखने तुरुंगात 18 वर्ष घालवली असून त्याने 7 वर्षांची शिक्षाही पूर्ण केली आहे. उमर शेख याची सुटका झाल्यानंतरही तो बाहेर येऊ शकणार नाहीये. आंतरराष्ट्रीय दबावामुळे इम्रान खान यांच्या सरकारने दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत उमर शेख याला तपास यंत्रणांच्या ताब्यात ठेवलं आहे.
सिंध उच्च न्यायालयाच्या ज्या न्यायाधीशाने या आरोपींची सुटका करण्याचा आदेश दिला आहे, त्याने आदेशात म्हटलंय की या आरोपींचा कोणताही अपराध नसताना त्यांना तुरुंगात खितपत पडावं लागलं आहे. सुटका करत असताना न्यायाधीशांनी या आरोपींनी देश सोडून जाऊ नये असे आदेशात म्हटले आहे, त्यासाठी या आरोपींची नावे नो-फ्लाय लिस्टमध्ये सामील करावीत असे आदेश न्यायाधीशाने दिले आहेत.
उमर शेखची सुटका करण्याच्या निर्णयावर पाकिस्तानातही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद यांनीही हा निर्णय आश्चर्यचकीत करणारा असल्याचं म्हटलंय. पाकिस्तानमधील पत्रकार संघटनांनी मागणी केली आहे की न्यायालयाने आपल्या आदेशावर पुन्हा विचार करावा.
उमर शेख याच्यावर ज्यांची हत्या केली होती ते पर्ल वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्युरो चीफ होते. 2002 साली त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं आणि शिर धडावेगळं करून त्यांची हत्या करण्यात आली होती.
उमर शेख याची सुटका करवून घेत आयएसआयने मोठा कट रचल्याचा अंदाज बांधला जात आहे. एकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी झुंजतंय. अमेरिकेमध्ये कोरोनाचा फैलाव जास्त होत असल्याने अमेरिकेचे संपूर्ण लक्ष हे कोरोना नियंत्रणात आणण्याकडे आहे. आत्ता उमेर शेखची सुटका झाली तर अमेरिका त्याबाबत फार काही बोलणार नाही असा अंदाज आयएसआयला असल्याने त्यांनी उमरची सुटका करून घेतल्याचं बोललं जात आहे.
कश्मीर खोऱ्यात हिंदुस्थानी सैन्याने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडलं आहे. तिथे पुन्हा आपला जोर वाढावा यासाठी उमर शेखला पुढे करण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे.
उमर शेख याने 1994 साली 4 विदेशी पर्यटकांचे अपहरण केले होते. हिंदुस्थानच्या सुरक्षा दलाने एका कारवाईत उमर शेख याला अटक केली होती. उमेर शेख हा गाजियाबादसह हिंदुस्थानातील अनेक तुरुंगात राहिलेला आहे. कंदहार विमान अपहरण प्रकरणानंतर हिंदुस्थानने जे दहशतवादी सोडले होते त्यात उमर शेखचाही समावेश होता.























































