केंद्र सरकार अडचणीत आल्यावर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा, नवाब मलिक यांचा मोदींना टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूका आल्या किंवा अडचणीत आले, की शेतकऱयांच्या खात्यात पैसे जमा होतात असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवारी शेतकरी सन्मान निधी खात्यात प्रत्येकी सहा हजार रुपये जमा करणार आहेत. यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला.

पैसे वसुलीसाठी नोटीसही

सहा हजार रुपये शेतकऱयांना देता आणि त्यांना पैसे परत करण्यासाठी नोटीसाही पाठवत आहात हे काय चाललेय असा सवालही त्यांनी केला.

संवादाला भाजपचे कार्यकर्ते

पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱयांशी संवाद साधणार आहेत मात्र या संवादाला भाजपचेच कार्यकर्ते बसलेले दिसतील आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खोटा प्रचारही करण्याचा प्रयत्न करतील अशी भीती नवाब मलिक यांनी व्यक्त केली.

म्हणून त्यांच्यावर ही वेळ

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यात आंदोलन करत आहेत. त्यांना विदर्भ आणि मराठवाडय़ात कोण विचारत नसल्याने त्यांच्यावर ही वेळ आल्याचेही नवाब मलिक म्हणाले.