
ख्रिसमस विकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक मालवणला दाखल झाले आहेत. पर्यटकांच्या गर्दीने समुद्र किनारे फुलले असून पर्यटन व्यावसाईकांकडून कोरोना नियमांचे पालन करत सुरक्षीतरित्या पर्यटकांचे आदरातिथ्य केले जात आहे. त्यामुळे कोरोना काळातही पर्यटकांची पहिली पसंती मालवण ठरत आहे.
गेले आठ महिने कोरोना काळात मालवणचे पर्यटन ठप्प होते. पर्यटन व्यवसाईक संकटात सापडला होता. मालवणच्या अर्थकारणावरही मोठा परिणाम झाला होता. या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर महिन्यात मिशन बिगीन अनलॉक अंतर्गत हॉटेल व्यवसाय सुरू झाला. त्यांनंतर शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हाधिकारी यांनी किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक सुरू केली.
खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सागरी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेले वॉटर स्पोर्ट्स व्यवसाय सुरू करण्यासही परवानगी दिली. त्यामुळे मालवणच्या पर्यटनास पुन्हा एकदा गती प्राप्त झाली असून व्यवसाईक सुखावला आहे.
मालवणात कोरोनाचा प्रादुर्भावही इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. मालवण शहर कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. मास्क व सोशल डिस्टन्स नियमांचे पालन पालिका व पोलीस प्रशासन कठोर पणे करत आहेत. याचा परिणाम म्हणून मालवणात कोरोनाचा शिरकाव कमी आहे.
यामुळे पर्यटकांची पसंती मालवण ठरत आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हाऊसफुल्ल ही स्थिती नसली तरी पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यात वृद्ध व लहान मुलांचा सहभागही आहे.
किल्ले सिंधुदुर्ग दर्शन, वॉटर स्पोर्ट्स, बोटिंग, पॅरासेलिंगचा आनंद पर्यटक मोठ्या प्रमाणात लुटत आहेत. त्याबरोबर मालवणी जेवणावर पर्यटक ताव मारत आहेत. एकूणच पर्यटकांनी ख्रिसमस विकेंडला मालवणला पसंती दिली आहे.
मालवण शहर, बंदर जेटी, चिवला बीच यासह दांडी, वायरी, तारकर्ली, देवबाग याठिकाणी सागरी पर्यटन व समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक लुटत आहेत. तसेच कृषी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या घुमडे येथेही निसर्गाच्या सानिध्यात पर्यटन सफरीला पर्यटक प्राधान्य देत आहेत.
रॉक गार्डन ‘फाउंटन’ आकर्षण
मालवण पालिकेच्या वतीने रॉक गार्डन येथे नव्याने म्युझिकल फाउंटन उभारण्यात आला आहे. कलरफुल लाईटिंग व मुझिकच्या तालावर उडणारे फवारे याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक रात्री उशिरापर्यंत गर्दी करत आहेत. याठिकणीही मास्क व सोशल डिस्टन्स ठेवण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करत सुरक्षित पर्यटनाला प्राधान्य दिले जात आहे.

























































