
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना सांगलीतुन एकाने फोन करून धमकी दिल्याची घटना घडली आहे. त्याशिवाय धायरीतील त्यांचे कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जयंत रामचंद्र पाटील (जिल्हा सांगली) असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजदीप कंठाळे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा आहेत. त्यांचे धायरीत कार्यालय आहे. आज दुपारी त्यांच्या कार्यालयात एकाने फोन केला. त्याने रुपाली चाकणकर कुठे आहेत, त्यांचा मोबाईल नंबर दे, ती काय करते बघतोच असे म्हणत जयंतने धमकावले.
राजदीप यांनी मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिल्यानंतर जयंतने चिडून जात नंबर द्यायचा नसेल तर बग, तुला माहीत आहे का मी कोण आहे असे म्हणत तुला कार्यकर्ते किंवा पोलीस बोलवायचे आहेत तर बोलव मी घाबरत नाही. कार्यालय पेटवून देईन असे म्हणत धमकावले. त्यानंतर फिर्यादी यांनी रुपाली चाकणकर यांना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत.































































