सिक्कीमच्या महिला सर्वाधिक वापरतात इंटरनेट! गोव्यातील पुरुष आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंटरनेटचे जाळे देशभरात विस्तारले आहे. पुरुषांप्रमाणे महिला देखील इंटरनेटच्या वापरात मागे नाहीत. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, इंटरनेटचा वापर करण्यात सिक्कीमच्या महिला तर गोव्याचे पुरुष आघाडीवर आहेत. सिक्कीममधल्या 76.6 टक्के महिला तर गोव्यातले 82.9 टक्के पुरुष इंटरनेट वापरतात.

नुकतेच देशातील 22 राज्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. महिला आणि पुरुष तसेच शहरी आणि ग्रामीण भागात हे सर्वेक्षण केले होते. एकीकडे इंटरनेट वापरात सिक्कीमच्या महिला आघाडीवर असताना बिहारमधील 10 पैकी 8 महिलांनी कधीच इंटरनेटचा वापर केला नसल्याचे समोर आले आहे.

पुरुषांमध्ये मेघालयातील पुरुष इंटरनेट वापरात सर्वात मागे असून येथील प्रमाण केवळ 42.1 टक्के एवढे आहे. महाराष्ट्रात 38 टक्के महिला तर 61.5 टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतात. गुजरात आणि कर्नाटकाच्या तुलनेत जम्मू कश्मीर आणि हिमाचलमध्ये इंटरनेट वापरणाऱया महिला अधिक आहेत.

महिलांकडे आले स्वतःचे फोन

2015-16 च्या सर्वेक्षणानुसार, 67 टक्के महिलांनी स्वतःकडे फोन असल्याचे सांगितले होते. आता हे प्रमाण 81 टक्के एवढे झाले आहे. गोव्यात हे प्रमाण सर्वाधिक असून येथील 10 पैकी 9 महिलांकडे स्वतःचे फोन आहेत.

सर्वाधिक इंटरनेटचा वापर करणाऱया राज्यांच्या यादीत गोव्यानंतर मिझोरम, सिक्कीम, केरळ, मणिपूर व जम्मू आणि कश्मीरचा क्रमांक लागतो. जम्मू आणि कश्मीरमध्ये 72 टक्के पुरुष आणि 43.3 टक्के महिला इंटरनेटचा वापर करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.