
ऍडलेड कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरा गेलेल्या हिंदुस्थानी संघाने मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 195 धावांमध्ये गुंडाळण्यात टीम इंडियाला यश लाभले. हिंदुस्थानच्या या शानदार कामगिरीचे श्रेय गोलंदाजांसोबतच कर्णधार अजिंक्य रहाणेलाही यावेळी देण्यात आले. सुनील गावसकर, रिकी पॉण्टिंग, शेन वॉर्न, व्हीव्हीएस लक्ष्मण, वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग या महान खेळाडूंनी अजिंक्य रहाणेच्या कल्पक नेतृत्वाची प्रशंसा केली.
…तर मुंबईच्या खेळाडूचे समर्थन केले असा आरोप होईल -गावसकर
सुनील गावसकर यावेळी म्हणाले, अजिंक्य रहाणेचे नेतृत्व शानदार होते असे मी म्हटले तर माझ्यावर मुंबईच्या खेळाडूचे समर्थन केले असा आरोप करण्यात येईल. त्यामुळे या प्रकरणात मी पडत नाही. पण याआधी अजिंक्य रहाणेने दोन कसोटी व वन डे सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते त्यामध्ये क्षेत्ररक्षक कुठे ठेवायला हवेत याची समज त्याला होती हे दिसून आले होते. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या डावात गोलंदाजांनी क्षेत्ररक्षणानुसार गोलंदाजी केली. त्यामुळे यश मिळाले अन् कर्णधाराचे कौतुक झाले, असेही सुनील गावसकर पुढे म्हणाले.
क्षेत्ररचना, गोलंदाजी बदल वाखाणण्याजोगा – पॉण्टिंग
ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग यानेही अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वगुणाचे कौतुक केले. यावेळी तो म्हणाला, ऍडलेडमधील निराशाजनक कामगिरीनंतर हिंदुस्थानी संघ उभा राहील का, याबाबत आम्ही चिंता करीत होतो. पण मेलबर्न कसोटीच्या पहिल्याच दिवशी त्यांनी वर्चस्व गाजवले. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाने अप्रतिम कामगिरी केली. अजिंक्य रहाणेचे मैदानातील नेतृत्व ‘काबिल ए तारीफ’ होते. त्याने केलेली क्षेत्ररचना व गोलंदाजीतील बदल वाखाणण्याजोगेच होते.
सेहवाग, लक्ष्मण, वॉर्न, हरभजनकडूनही स्तुती
वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, शेन वॉर्न व हरभजन सिंग यांनीही सोशल साइटवर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाची स्तुती केली. वीरेंद्र सेहवागने रिकी पॉण्टिंगप्रमाणेच क्षेत्ररचना व गोलंदाजीतील बदल याचे कौतुक केले. शेन वॉर्नने हिंदुस्थानी गोलंदाजांचे कौतुक करतानाच अजिंक्य रहाणेने चांगले नेतृत्व करीत संघाला पुढे नेले, असे नमूद केले. ऍडलेड कसोटीतील पराभव मागे टाकून टीम इंडियाने अजिंक्य रहाणेच्या कर्णधारपदात झोकात पुनरागमन केले, असे व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला.




























































