
कारागृहातून बाहेरची सूत्रे हलविण्यासाठी गँगस्टर हरीश मांडवीकर लिहून देत असलेल्या चिठ्ठ्या एक हेड कॉन्स्टेबल कारागृहाबाहेर त्याच्या हस्तकांपर्यंत पोहचवत असल्याचे उघडकीस आले आहे. अर्जुन घोडके असे त्या हेड कॉन्स्टेबलचे नाव असून त्याच्या विरोधात तसे सबळ पुरावेच हात लागल्याने एटीएसने त्याला अटक केली आहे.
जून 2015 मध्ये एटीएसने ड्रग्ज बनविणाऱया एका युनिटवर छापा मारून 155 किलोग्रॅम कच्चा व तयार एमडीचा साठा जप्त केला होता. त्यावेळी या गुन्ह्याचा म्होरक्या साजिद इलेक्ट्रिकवाला याच्यासह सात जणांना अटक झाली होती. या एनडीपीएस खटल्याची सुनावणी सुरू असून एका साक्षीदाराची साक्ष अपूर्ण राहिली होती. त्यामुळे 26 नोव्हेंबर रोजी कांदिवली येथे राहणाऱया त्या साक्षीदारास साक्षीसाठी बोलावले होते. पण मांडवीकर याने त्याचा हस्तक सचिन कोळेकर याला चिठ्ठी लिहून त्या साक्षीदारास धमकावण्यास सांगितले. त्यानुसार कोळेकरच्या इशाऱयावरून एक आठवडा आधीच साक्षीदारास ओळखणारा सुजीत पडवळकर त्याला भेटला आणि इलेक्ट्रिकवाला विरोधात खोटी साक्ष देण्यास म्हणाला. त्यानंतर सलग चार-पाच दिवस पडवळकर याने साक्षीदारास भेटून खोटी साक्ष देण्याबाबत धमकावले. हा प्रकार साक्षीदाराने एटीएसच्या चारकोप युनिटला सांगितला. त्यानुसार चारकोप युनिटने पडवळकर यास साक्षीदारास धमकावताना रंगेहाथ पकडले. मग कोळेकरच्यादेखील मुसक्या आवळल्या.
या दोघांच्या अटकेनंतर एटीएसने केलेल्या तपासात इलेक्ट्रिकवाला याच्यासोबत कारागृहात असलेला गँगस्टर हरीश मांडवीकर याने पडवळकरकरवी हे कृत्य केल्याचे समोर आले. पडवळकरला असे करण्यासाठी मांडवीकरने त्याला कारागृहातून चिठ्ठी लिहून पाठवली होती असे एटीएसच्या तपासात निष्पन्न झाले.
मांडवीकर याचा मटका पिंग सुरेश भगत हत्याकांडातही सहभाग होता. जेलमध्ये सोबत असलेल्या इलेक्ट्रिकवाला विरोधात खोटी साक्ष देण्यासाठी त्याने या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारास आपल्या हस्तकांमार्फत धमकावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तो चिठ्ठी लिहून कारागृहाबाहेर पाठवायचा. एटीएसने मांडवीकरच्या चिठ्ठ्या बाहेर पाठविणाऱयाचा शोध घेतला असता हेड कॉन्स्टेबल अर्जुन घोडके हे काम करीत असल्याचे समोर आले. केवळ आताच नाही तर यापूर्वीदेखील घोडके याने मांडवीकरने लिहिलेल्या चिठ्ठ्या कारागृहाबाहेर त्याच्या हस्तकांपर्यंत पोहचविल्याचे निष्पन्न झाले आहे. घोडके याला अटक करून कोर्टात हजर केले असता 28 डिसेंबरपर्यंत एटीएसची कोठडी देण्यात आली.































































