
पावसाळा सरून थंडीची चाहूल लागताच डोंगर रांगांमधील जंगलात विविध रंगी पक्षांची रेलचेल सुरू होते.त्यांच्या मंजुळ किलबिलाटाने मन प्रसन्न होते. हा अनुभव घ्यायचा असेल तर उरण तालुक्यातील निसर्गसंपन्न चिरनेरच्या जंगलात जावे लागेल.
या गुलाबी थंडीच्या वातावरणात चिरनेरचे जंगल विविध रंगी पक्षांनी फुलून गेले आहे. त्यांच्या मंजुळ किलबिलाटाने निसर्गप्रेमीं सुखावून गेले आहेत. उरण तालुक्याच्या पूर्व भागात निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरकुशीत चिरनेर हे ऐतिहासिक गाव वसले आहे. चिरनेरच्या पूर्व भागात विस्तिर्ण जंगल पसरले आहे. या जंगलात मोठ्या प्रमाणात जंगली पशुपक्षांचे वास्तव्य आहे. या जंगलात मुबलक नैसर्गिक पाणवठे असल्याने हे जंगल पशुपक्षांचे आश्रय स्थान झाले आहे.
सध्या गुलाबी थंडीचे मस्त वातावरण असल्याने जंगल भ्रमंती करताना या जंगलात विविधरंगी अनेक प्रजातींच्या पक्षांचे मनोहारी दर्शन होते. मोर, लांडोर, रानकोंबडे, सुतार पक्षी, कोकीळ, बुलबुल, यलो स्पॅरो, गवळण, सोनकावळे, तितर, धनेश, गरुड, पोपट, दयाळ यासारखे विविध जातीचे पक्षी सहज नजरेस पडतात. त्यांचा मंजुळ किलबिलाट मनाला सुखावून जातो.
या जंगलात आदिवासी समाजाची मोठी वस्ती असूनही या समाजातील तरुणांनी जंगलातील पशु-पक्षांची शिकार न करण्याचा निर्धार केल्याने चिरनेरच्या जंगलात सध्या विविध पशुपक्षां बरोबरच मोर-लांडोरींची संख्या झपाट्याने वाढली आहे. मात्र काही शिकारी या पशुपक्षांची चोरटी शिकार करीत असल्याने आदिवासी बांधव नाराजी व्यक्त करीत आहेत.
चिरनेरचे जंगल पक्षी प्रेमींना पक्षी निरीक्षणासाठी पर्वणी ठरणार आहे. या जंगतील पशुपक्षांना अभय दिले तर निसर्गप्रेमी जनतेला हा निसर्गठेवा नेहमीच अनुभवायला मिळणार आहे.शहराच्या गर्दीतून निघून चिरनेरच्या जंगलात पायपीट केली तर निसर्गप्रेमींना नक्कीच सुखद अनुभव मिळणार आहे.




























































