
सेलू पोलीस ठाण्यात 26 डिसेंबर रोजी फसवणूक व दरोडा प्रकरणी 8 आरोपीच्या विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यातील 4 आरोपींना 5 लाख 5 हजार रोख रकमेसह 48 तासात गजाआड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा परभणी व सेलू पोलिसांनी संयुक्तरित्या ही कामगिरी करून यश मिळवले आहे.
मुबंई येथील महिला डॉक्टर उज्वला संदीप बोराडे यांना अर्ध्या भावात सोने विकत देण्याच्या नावाखाली अज्ञात आरोपीच्या मदतीने मारहाण करून 8 लाख रुपये व दोन मोबाईल जबरीने पळवले होते. याबाबत सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व उपविभागीय पोलीस अधिकारी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखा व पोलीस स्टेशन सेलूची चार पथके पाठवण्यात आली होती. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे तांत्रिक पद्धतीने तपास केला असता सदर गुन्हा स्थानिक आरोपीने बाहेर जिल्ह्यातील आरोपीच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले.
यावरून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन सेलू येथील अधिकारी व कर्मचार्यांनी संयुक्तरित्या शोध मोहीम राबवली व या गुन्ह्यातील मुख्य आरोपी जवळा जिवाजी येथे असल्याची खात्री करण्यात आली. गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी व्यंकटेश्वर आलेवार व सेलू पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन जवळा जिवाजी (ता. सेलू) येथून मुख्य आरोपी सुनीता भोसले हिला रोख रक्कम 2 लाख 40 हजार रूपये व आरोपी मंजिरी सुखवास शिंदे हिला 2 लाख 50 हजार रुपये रोख रकमेसह ताब्यात घेतले.
तसेच सेलू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विजय रामोड व स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांनी यातील आरोपी श्रीनाथ भोसले व शैलेश शिंदे यांना शेळगाव तालुका सोनपेठ येथून 15 हजार रुपये रोख रक्कमेसह ताब्यात घेतले आहे. याप्रकारे सदरील गुन्ह्यातील 4 आरोपींना 5 लाख 5 हजार रुपयांच्या मुद्देमालासह गजाआड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे.
यातील उर्वरित रक्कम व इतर आरोपीच्या शोधात पोलीस असून लवकरच त्यांना देखील ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती यावेळी सेलूचे पोलीस अधिकारी विजय रामोड यांनी पत्रकारांना दिली आहे.



























































