
मुख्यमंत्री होण्याची माझी बिल्कूल इच्छा नव्हती, परंतु माझ्यावर दबाव आणला गेला असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले आहे. नितीश कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सर्वात कमी जागा मिळूनही भाजपच्या साथीने कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. आता आपल्याला मुख्यमंत्रीपदी राहण्याची बिल्कूल इच्छा नाही असेही कुमार म्हणाले.
दबाव आणला गेला
नितीश कुमार म्हणाले की “मला मुख्यमंत्री होण्यात बिल्कूल रस नव्हता. पण माझ्यावर दबाव आणला गेला. आता कोणीही मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडणार नाही. या पदावर राहण्याची माझी बिल्कूल इच्छा नाही” असे कुमार म्हणाले आहेत.
नितीश कुमारच मुख्यमंत्री
बिहार निवडणुकीत भाजपला 74 तर जेडीयुला अवघ्या 43 जागा मिळाल्या होत्या. ही आपली अखेरची निवडणूक असल्याचे नितीश कुमार यांनी जाहीर केले होते. तसेच जेडीयुच्या जागा जरी कमी आल्या तरी नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील असे भाजपने जाहीर केले होते. त्यानुसार नितीश कुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
नाटक करत आहे, काँग्रेसची टीका
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या विधानामुळे बिहारमधील राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने कुमार यांच्यावर टीका करत ते नाटक करत असल्याचे म्हटले आहे. काँग्रेस प्रवक्ता राजेश राठोड म्हणाले की 2014 साली लोकसभा निवडणूक हरल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन जीतन राम मांझी यांनी मुख्यमंत्री बनवले होते. नंतर पुन्हा ते मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री भाजपने केलेल्या अपमानामुळे दुःखी आहेत. बिहारच्या जनतेने राजद म्हणजेच तेजस्वी यादव यांना कौल दिला होता, पण नितीश कुमार जबरदस्तीने मुख्यमंत्री झाले असे राठोड म्हणाले.



























































