
सेवानिवृत्ती जवळ आली असताना आणि अत्यंत विलंबाने जन्मतारखेतील चूक दुरुस्ती करण्यासाठी याचिका करणाऱया सरकारी कर्मचाऱयांना कोणताही दिलासा देता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. निवृत्ती एका वर्षावर आलेली असताना मुंबईतील एका पालिका कर्मचाऱयाने केलेली याचिका फेटाळून लावताना न्यायमूर्ती के. के. तातेड व न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने हे स्पष्ट केले.
खंडपीठात ही याचिका सुनावणीस आली असता पालिकेतर्फे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, कोणत्याही कर्मचाऱयाला इतक्या विलंबाने आणि निवृत्ती जवळ आली असताना अशी याचिका करता येत नाही. याविषयी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेला कायदा स्पष्ट आहे. खंडपीठाने हा युक्तीवाद ग्राह्य धरत या प्रकरणात पालिकेने 5 सप्टेंबर 1997 रोजी विनंती अर्ज फेटाळला असताना याचिकाकर्त्याने याचिका करण्यासाठी 23 वर्षांचा प्रदीर्घ विलंब का केला, याचे कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. शिवाय ते पुढच्याच वर्षी निवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेच्या निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवत याचिका फेटाळून लावली. कोणत्याही सरकारी विभागातील नोकरीसाठी अर्हतेचे वय निश्चित असते. निवृत्तीच्या टप्प्यावर जन्मतारखेतील दुरुस्तीसाठी येणाऱया याचिकांवर उच्च न्यायालयांनी दिलासा देऊ नये, अशा आशयाचा निवाडा सर्वेच्च न्यायालयाने यापुर्वीच दिलेला आहे.





























































