नववर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीने; उत्तर हिंदुस्थानात हिमवृष्टी, पावसाचा अलर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी नवी दिल्लीत रविवारी रात्री झालेल्या पावसाने थंडीचा कडाका आणखी वाढला आहे. यावेळी नववर्षांच्या सुरुवातीपासूनच पाऱ्यात आणखी घसरण होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. डोंगराळ भागातही मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मसूरीमध्ये मौसमातील पहिली हिमवृष्टी झाली आहे. तर वैष्णोदवी परिसरातही बर्फाची चादर पसरली आहे.

डोंगराळ भागात होणाऱ्या हिमवृष्टीमुळे उत्तर हिंदुस्थानात थंडीचा कडाका वाढला आहे. तिथे थंडीची लाट आणखी तीव्र होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. थंडीचा वाढणारा कडाका आणि वाढत्या धुक्यामुळे राजधानीतील नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. राजधानी नवी दिल्लीत येत्या 24 तासात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याने हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.

दाट धुक्यामुळे दिल्लीत दृश्यमानता कमी झाली आहे. सूर्योदय झाल्यानंतरही दाट धुक्यांचा परिणाम शहरात दिसून येत आहे. त्यामुळे दिल्ली मेरठ एक्सेप्रेस हायवेवर गाड्यांचा वेग मंदावला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिल्ली एनसीआरमध्ये तापमान 3 ते 5 अंशापर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतच दिल्लीकरांना नववर्षाचे स्वागत करावे लागणार आहे.

उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्येही थंडी आणि धुक्यांचा परिणाम दिसून येत आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पारा शून्याजवळ गेल्याने पाणी गोठण्यास सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब,चंदीगड, हिमाचल प्रदेशमध्ये थंडीचा लाट कायम आहे. त्यात दाट धुक्यांमुळे अडचणीत वाढ झाली आहे. सिमलामध्ये पारा 4 अंशापर्यंत खाली घसरला आहे. डोंगराळ भागात झालेल्या हिमवृष्टीने राज्यात थंडीची लाट आली आहे.

थंडीच्या वाढत्या कडाक्याने जम्मू कश्मीरमध्येही नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. नळातील पाणाही गोठत आहे. तसेच झाडावरील दवबिंदूही गोठल्याने परिसरात बर्फाची चादर पसरलेली दिसत आहे. जम्मू कश्मीरमध्ये अनेक भागात पारा शून्य अंशाच्या खाली घसरून तापमान उणे अंशापर्यंत गेले आहे. आणखी काही दिवस थंडीचा लाट कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.