हिंदुस्थानमध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव, ब्रिटनहून आलेल्या 6 प्रवाशांना लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

हिंदुस्थानमध्ये नव्या कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी 6 जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘इंडिया टुडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नव्या कोरोनाची लागण झालेल्या 6 जणांपैकी तीन जणांना बंगळुरू इथल्या निमहांस या संस्थेत, दोन रुग्णांना हैदराबादच्या सीसीएमबी आणि एका प्रवाशाला पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे. या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा आणि सह प्रवाशांचा तपास सुरू आहे.

33 हजार प्रवासी आले

दरम्यान, ब्रिटनमधून 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात देशातील विविध विमानतळांवर अंदाजे 33 हजार प्रवासी आले आहेत. या सर्व प्रवाशांची ते राहत असलेल्या राज्यांमध्ये आरटी-पीसीआर चाचणी केली जातेय. आतापर्यंत या प्रवाशांपैकी एकूण एकशे चौदा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यातील 6 जणांना नव्या कोरोनाची लागण झालेली आहे.

विमानसेवा बंद

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार दिसल्यानंतर हिंदुस्थानने ब्रिटन-हिंदुस्थान विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा नवा अवतार आधीपेक्षा 70 टक्के अधिक घातक असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.

ब्रिटननंतर या देशातही शिरकाव

कोरोनाचा नवा अवतार सर्वात आधी ब्रिटनमध्ये आढळून आला. त्यानंतर डेनमार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्विडन, फ्रान्स, स्पेन, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनान, सिंगापूरमध्येही या नव्या कोरोनाने शिरकाव केला आहे.