
‘आनंदवन’च्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला असा निष्कर्ष शवविच्छेदनातील प्राथमिक अहवालात काढण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
डॉ. शीतल यांच्या मृत्यूमागे काही घातपात असल्याचे दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ. शीतल आमटे यांचा मृत्यू महिनाभरापूर्वी झाला होता. डॉ. शीतल या मानसिक तणावात होत्या आणि गेल्या सहा महिन्यांपासून नागपूर येथील मानसोपचारतज्ञांकडे उपचार घेत होत्या असे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे साळवे यांनी सांगितले. जून 2020 मध्येही त्यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशीही माहिती त्यांनी दिली.
डॉ. शीतल यांच्या मृतदेहाजवळ एक इंजेक्शन सापडले होते. त्याबाबतही साळवे यांनी खुलासा केला. अल्सर झालेल्या श्वानांना देण्यासाठी डॉ. शीतल यांनी तीन प्रकारची इंजेक्शने मागवली होती. त्यातीलच एका इंजेक्शनचे रिकामे अॅम्फूल त्यांच्या मृतदेहाजवळ सापडले होते असे त्यांनी सांगितले. मात्र त्याच इंजेक्शनमुळे त्यांचा मृत्यू झाला का हे व्हिसेरा अहवालात स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले. टॅब-मोबाईल आणि लॅपटॉप यांचा अहवाल अद्याप यायचा बाकी असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

































































