
खेड तालुक्यातील 87 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारच्या शेवटच्या दिवसापर्यंत दाखल झालेल्या 1190 अर्जापैकी 8 उमेदवारी अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे अवैध ठरले तर 1182 अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणुक कार्यालयातून देण्यात आली.
खेड तालुक्यातील 87 ग्रामपंच्यायतींचा कार्यकाळ संपला असल्याने निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 ते 30 डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करायचे होते. त् नुसार 29 आणि 30 डिसेंबर या दोन दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांनी गर्दी केली होती. अर्ज दाखल करताना उमेदवारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे तहसिल कार्यालयाच्या आवारात काही काळ गोंधळ झाला होता.
दाखल झालेल्या 1190 उमेदवारी अर्जाची गुरुवारी छाननी करण्यात आली. या अर्जापैकी 8 उमेदवारी अर्ज वेगवेगळ्या कारणांमुळे अवैध ठरविण्यात आले. सद्यस्थितीत 87 ग्रामपंचायतीच्या एकूण 681 जागांसाठी 1182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 4 जानेवारी ही तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यावरच निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहेत हे स्पष्ट होणार आहे.

































































