चारठाण्यात आढळला सोनपाठी सुतार; पक्षीनिरीक्षक विजय ढाकणे यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिंतूरमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील शिरसाच्या झाडावर सोनपाठी सुतार पक्षी आढळून आल्याची माहिती पक्षी निरीक्षक विजय ढाकणे यांनी दिली. जिंतूर तालुक्यातील चारठाणा परिसरात पाहिल्यांदाच हा पक्षी आढळून आला आहे.

सोनपाठी सुतार हा साधारण 30 से.मी. आकारमानाचा पक्षी असून याच्या पाठीच्या सोनेरी रंगावरून याचे नाव सोनपाठी सुतार असे पडले आहे. इंग्रजीत याला व्हाइट नेपेड वुडपेकर किंवा फ्लेम बॅक वूड पेकर असे म्हणतात. याच्या रंग आणि आकारावरून किमान 4 उपजाती आहेत. नर सोनपाठी सुताराच्या पाठीचा रंग सोनेरी पिवळा, माथा व तुरा लाल, डोळ्याजवळ काळे-पांढरे पट्टे, फिकट पांढऱ्या रंगाचे पोट व गळ्यापासून पोटाच्या मध्यभागापर्यंत काळे-पांढरे ठिपके असतात. त्याची शेपटी काळ्या रंगाची असते.

मादी नरासारखीच असते फक्त रंग थोडे फिके असतात. सोनपाठी सुतार हिंदुस्थानसह पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका (येथे दोन उपजाती), म्यानमार (येथे तीन उपजाती) या देशांमध्येही आढळतो. सोनपाठी सुतार विरळ आणि झुडपी जंगलात तसेच शेतीजवळच्या प्रदेशात राहतो. झाडाच्या सालीत लपलेले कीटक पकडण्यासाठी हा वेगाने झाडाच्या खोडात छिद्र करतो. किटकांशिवाय मध आणि पिकलेली फळेही सोनपाठी सुताराला आवडतात. हा उडताना बहुतेकवेळा कर्कश आवाजात ओरडतो. त्यावरून सोनपाठी सुताराला जंगलात सहजपणे शोधता येते.

मार्च ते ऑगस्ट हा सोनपाठी सुताराचा वीण हंगाम असून याचे घरटे जमिनीपासून 2 ते 10 मीटर उंचीवर झाडाच्या ढोलीत असते. मादी एकावेळी 2 ते 3 चमकदार पांढऱ्या रंगाची अंडी देते. सोनपाठी सुतार नर आणि मादी मिळून पिलांची देखभाल करतात. जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या पत्नी तेहमिना यांचे नाव सोनपाठी सुताराच्या एका उपजातीला देण्यात आले आहे.

सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी तांबटाच्या घरट्याचे निरीक्षण करत असताना अचानक या नवीन पाहुण्याचे दर्शन झाल्याने खूप आनंद झाला. परिसरातील वातावरण जैवविविधतेला पूरक असल्याने अनेक वेगवेगळ्या पक्ष्यांचा अधिवास या भागात आढळतो. सध्या तांबट आणि बोनेलिस गरुडाचे नेस्टिंग जवळच सुरू असून त्यानिमित्ताने निरीक्षण करता येत आहे.
-विजय ढाकणे, पक्षी निरीक्षक