वरळी सी फेसवर सिग्नल यंत्रणा चमकली, आदित्य ठाकरे यांची संकल्पना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत सिग्नल यंत्रणेतील स्त्रीपुरुष समानतेचा प्रयोग दादरमध्ये ऑगस्टपासून सुरू झाल्यानंतर आता वरळी सी फेसमधील सिग्नल यंत्रणेला युनिडायरेक्टरल ट्रफिक लाइटचा नवा चमकता साज चढवला आहे. यामुळे मुंबईच्या सौंदर्यात भर पडणार असून मुंबईची वाहतूक व्यवस्थाही अधिक सुरक्षित होणार आहे. पालिकेकडून राबवल्या जाणाऱया या उपक्रमाची संकल्पना शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची असून त्यांनी उपक्रम राबवल्याबद्दल पालिकेचे कौतुक केले आहे.


कोरोनाच्या काळात मुंबई महापालिका एकीकडे मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेऊन कोरोना नियंत्रणात आणत असतानाच विकासकामेही त्याच जोडीने सुरू आहेत. याचबरोबरीने देशाची आर्थिक राजधानी असलेले हे शहर वाहतुकीच्या दृष्टीनेही सर्वोत्तम व्हावे, वाहनचालक आणि पादचाऱयांसाठी सोयीचे व्हावे याकडेही पालिका लक्ष देत आहे. त्यासाठी वाहतूक विभाग आणि खासगी संस्थेची मदत घेत वरळी सी फेसमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 1 जानेवारीपासून युनिडायरेक्टरल ट्रफिक लाइट बसवण्यात आली आहे. सिग्नल यंत्रणेला युनिडायरेक्टरल ट्रफिक लाइटमध्ये रूपांतरित करण्यासाठी पालिकेच्या अभियंत्यांनी जीवापाड मेहनत घेत ही किचकट प्रक्रिया सोपी केली आहे. यात एलएडी लाइटचा वापर केला जाणार असून वीजपुरवठा योग्य असण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती जी/दक्षिणचे पालिका सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी दिली.

  • युनिडायरेक्टरल ट्रफिक लाइटमुळे दोन्ही दिशांनी येणाऱया वाहनचालकांना अगदी लांबून सिग्नल दिसू लागेल. त्याचा अंदाज आल्यामुळे वाहनांचा वेग आधीच कमी करणे शक्य होईल.
  • पादचाऱयांनाही सिग्नल लांबून दिसल्यामुळे सिग्नल ओळखून रस्ता ओलांडणे सोपे होईल.
  • ऊन, पाऊस, सोसाटय़ाचा वारा यांचा मारा हे नवीन युनिडायरेक्टरल ट्रफिक खांब टिकून राहणार आहेत.
  • रात्रीच्या वेळी ही यंत्रणा अधिक ठळकपणे दिसल्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे.
  • वरळीबरोबर हाजी अली, प्रिन्सेस स्ट्रीट तसेच इतर भागांत असे युनिडायरेक्टरल ट्रफिक लाइट तयार केले जाणार आहेत.

‘वरळी सी फेसजवळ पालिकेने वाहतूक विभागाच्या मदतीने युनिडायरेक्टरल ट्रफिक लाइट उभारली आहे. मुंबईची वाहतूक सुरक्षा तसेच सौंदर्यात त्यामुळे भर पडणार आहे. प्रायोगिक तत्त्वावरील ही योजना यशस्वी झाली तर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारची सिग्नल यंत्रणा सुरू केली जाईल. जी/दक्षिणचे पालिका सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.’ – आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री