
कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या तटबंदीवरून मोबाईल, गांजा फेकल्याचे दोन वेळा प्रकार समोर आले. त्यानंतरही कारागृहात बेकायदेशीररीत्या मोबाईल आढळल्याने सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर खडबडून जाग आलेल्या कारागृह प्रशासनाने आता कारागृहाची अंतर्गत सुरक्षा असूर नावाच्या श्वानावर सोपविली आहे. शुक्रवारी रात्रीपासून कळंबा कारागृहात ‘असुरा’चा पहारा सुरू झाला आहे.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात गांजा, मोबाईल, बॅटऱया, पेन ड्राइव्ह, मोबाईल चार्जरची वायर अशा आक्षेपार्ह वस्तू वारंवार आढळून आल्या आहेत. याप्रकरणी तत्कालीन कारागृह अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी येरवडा कारागृहाचे अधीक्षक चंद्रमणी इंदुरीकर यांची नियुक्ती झाली होती. यानंतरही कारागृह अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा कारागृहात एका बराकीशेजारी मोबाईल आढळल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती. याची गांभीर्याने दखल घेत अशा संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यासाठी पोलीस दलाप्रमाणेच कळंबा कारागृहामध्ये श्वानाची नेमणूक करण्याची मागणी नूतन कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी कारागृह प्रशासनाकडे केली होती.
या मागणीला कारागृहाचे अपर पोलीस महासंचालक रामानंद यांनी तत्काळ मान्यता दिली. त्यानंतर शुक्रवारी रात्री फलटण येथून 18 महिने वयाच्या ‘असूर’ नावाच्या श्वानाला कळंबा कारागृहात पाचारण करण्यात आले. यापुढे असूर श्वानाद्वारे अभिनव पद्धतीने कळंबा कारागृहाची सुरक्षा सांभाळण्यात येणार आहे. तसेच, कारागृहात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठीही असूर श्वान पहारा देणार असल्याची माहिती कारागृह प्रशासनाने दिली.
सीसीटीव्हीसाठी 50 लाखांची मागणी
कळंबा कारागृहातील सीसीटीव्ही व मोबाईल जॅमरची यंत्रणा सध्या अपुरी पडत आहे. या यंत्रणेचे पुनरुज्जीवन करून कारागृहात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व अन्य सुविधांसाठी 50 लाखांच्या निधीची मागणी शासन दरबारी केल्याची माहिती कारागृहातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली आहे.




























































