
अवघ्या दोन वर्षांच्या नकळत्या वयात आलेल्या तापाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं. तिचेच नाही तर या तापामुळे संपूर्ण परब कुटुंबियांचे आयुष्यच बदलून गेले.
तापात सेजलला ग्रासले ते दुर्धर मेंदूच्या आजाराने. सेजलचे शारीरिक वय तर वाढले पण तिचे मानसिक वय त्यानंतर वाढू शकले नाही. सेजल आता 13 वर्षांची झाली आहे. पण तिच्या मनाची अवस्था अजूनही तीन ते चार महिन्यांच्या बाळासारखीच आहे. सेजलला बरे करण्यासाठी तिच्या वडिलांनी अपार कष्ट केले. मात्र कहर झाला आहे तो सध्याच्या परिस्थितीमुळे. ऐन कोरोनाच्या काळात सेजलच्या वडिलांची नोकरी गेली आणि उरलासुरला असणारा आशेचा किरणही नाहीसा झाला. आता सेजलवर नक्की कसे उपचार होणार हाच प्रश्न परब कुटुंबियांचे मन पोखरत आहे.
सध्याच्या या हलाखीच्या परिस्थितीत सेजलच्या खर्चासाठी दरमहिन्याला 15 हजार रुपयांचा खर्च येत असून वार्षिक खर्च जवळपास 1 लाख 80 हजारांच्या घरात आहे. पण हार न मानता सेजलच्या उपचारासाठी दानशूर लोकांनी पुढे येण्याचे आवाहन रुग्णालय आणि तिच्या वडिलांकडून करण्यात आले आहे. यासंदर्भात ज्या व्यक्तींना सेजलला मदत करावयाची आहे त्यांनी 9892730224 आणि 7977721042 या क्रमाकांवर संपर्प साधण्याचे आवाहन वडील कृष्णा परब यांनी केले आहे.



























































