
>> डॉ. प्रीतम भि. गेडाम
आपण ग्राहक म्हणून जागरूक असणे खूपच गरजेचे आहे आणि यासाठीच शासनाने ग्राहकांच्या हक्क संरक्षणाकरिता कायदे तयार केले आहेत. प्रत्येक वस्तू स्वस्त असेल म्हणून ती निकृष्ट दर्जाचे असेल असे नसते आणि महाग असेल म्हणजे चांगलीच असेल असेही नसते. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे जेनेरिक औषधी आहे. म्हणून फक्त पैशाच्या किमतीवरूनच वस्तूचा दर्जा ओळखू नये. जागरूक व्हा आणि एक जबाबदार ग्राहक बना. ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा. नेहमी शॉपिंगकरिता नामांकित ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच खरेदी करा. दिशाभूल करणाऱ्य़ा जाहिरातीपासून दूर रहा.
आजच्या डिजिटल जिथे बहुतेक कामे ऑनलाइन केली जातात. प्रत्येकाकडे स्मार्ट मोबाईल, संगणक, संसाधने आहेत. एका क्षणात आपण जगाच्या कोणत्याही भागात संपर्क साधू शकतो, व्यवहार करू शकतो. यामुळे जीवन सोपे झाले आहे. आता ई-कॉमर्सच्या रूपात प्रत्येक प्रकारच्या व्यवसायाच्या वस्तू आपल्यासाठी उपलब्ध आहेत. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण ऑनलाइन खरेदी करू शकतो, परंतु त्याच्या फायद्यांसह काही खबरदारी लक्षात ठेवणेदेखील आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्राप्रमाणे या भागातही फसवणुकीचे प्रमाण वाढत चालले आहे. सुशिक्षित ग्राहकांचीदेखील ऑनलाइन फसवणूक मोठय़ा प्रमाणात होत आहे.
आज इंटरनेटद्वारे एका क्लिकवर जगभरातील माहिती मिळते, परंतु यापैकी बऱ्य़ाच वेबसाइट्स केवळ आकर्षण, देखावा आणि फसवणुकीसाठी आहेत, ज्या फक्त चांगलेपणाचा आव आणून खोटा देखावा करतात. कोणीही बनावट वेबसाइट बनवून त्यावर अतिआकर्षक उत्पादनांच्या विक्रीचे आमिष दाखवतात. ते मोठमोठे दावे करतात. दहा-दहा हजार रुपयांच्या नामवंत कंपनीच्या वस्तू फक्त पाचशे रुपयात विक्रीचे सांगतात.
95 टक्क्यांपर्यंत सवलतीच्या ऑफर दाखवितात, पण त्याच बँडची ओरिजिनल वस्तू प्रत्यक्षात 500 रुपयांमध्ये मिळते का? या आठवडय़ात मी अशाच 8-10 ई-कॉमर्स वेबसाइट सर्च केल्या, ज्या घरगुती वस्तू विकतात, त्या वस्तूंच्या किमतीही अगदी कमी असल्याचे दर्शविले गेले, पण जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी दिलेल्या नंबरवर कॉल केला तर त्या सगळ्या वेबसाइटवर दाखविण्यात आलेले संपर्क क्रमांक बंद होते आणि त्यांनी मी केलेल्या ई-मेललासुद्धा प्रतिसाद दिला नाही, तर त्यातील काही ई-मेल आयडी चुकीचे दिले होते.
आता यावरून समजून येते की, सत्य परिस्थिती काय असणार! तरीही हजारो ग्राहक दररोज अशा वेबसाइटवर खरेदी करतात आणि त्यांची फसवणूक होते. मागील महिन्यात माझ्या एका मित्राने अशाच एका बनावट वेबसाइटवरून नामांकित कंपनीचे घडय़ाळ अगदी स्वस्त किमतीत विकत घेतले, पण जेव्हा ती वस्तू घरी आली तेव्हा त्या घडय़ाळाऐवजी वॉच बॉक्समध्ये कचरा सापडला. बऱ्य़ाचदा अनेक ग्राहकांसोबत असेच घडते, परंतु लोक या फसवणुकीविरुद्ध कारवाईच करत नाहीत. म्हणूनच हा फसवणुकीचा व्यवसाय इतका चालला आहे.
ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगा. नेहमी शॉपिंगकरिता नामांकित ई-कॉमर्स वेबसाइटवरूनच खरेदी करा. दिशाभूल करणाऱ्य़ा जाहिरातीपासून दूर रहा. विचार न करता कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. विशेषतः त्या लिंक ज्या सोशल मीडियावर व्हायरल होतात.
एखादे उत्पादन खूपच सूट किंवा खूपच स्वस्त असण्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण कोणतीही कंपनी कमवायला बसली आहे, तेव्हा ती स्वतःचे नुकसान करून वस्तू कशाला विकेल? वैयक्तिक बँकिंग माहिती सामाईक करू नका. सोशल मीडियावर आपली वैयक्तिक माहिती सामाईक करणे टाळा. ऑनलाइन वस्तू खरेदी करताना धोरण, अटी आणि शर्ती जाणून घ्या. त्यांचा ई-मेल आयडी, संपर्क क्रमांक तपासा. सोबतच ऑनलाइन मॅपद्वारे दिलेला पत्ता सत्यापित करून बघा आणि नवीन अज्ञात वेबसाइटवरील उत्पादने खरेदी करणे शक्यतो टाळा.
दिलेला वेब पत्ता यूआरएल काळजीपूर्वक पहा. सुरक्षित इंटरनेट कनेक्शन तपासा, पेमेंट करण्याचे सर्व पर्याय बघून घ्या. आजकाल नामांकित कंपनी, बँक किंवा सरकारी वेबसाइटची कॉपी करून हुबेहूब बनावट वेबसाइट बनवून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
नवनवीन स्कीमअंतर्गत पैसे, प्रचंड सूट किंवा बक्षीस देण्याचा लोभ दाखवून बनावट वेबसाइटद्वारे लिंक, ई-मेल किंवा संदेश पाठविला जातो. लोभ ही एक वाईट गोष्ट आहे. ऑनलाइन खरेदी करताना विशेष काळजी घ्या. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी नेहमी अधिकृत वेबसाइट किंवा बँकिंग मोबाईल ऍपचाच वापर करावा.
इंटरनेटशी कनेक्ट होण्यासाठी एक सुरक्षित माध्यम वापरा. सुरक्षित गुणवत्तापूर्ण ब्राऊझरचा वापर करावा. अशा प्रकारच्या सावधगिरीनंतरही आपली फसवणूक झाल्यास त्वरित तक्रार नोंदवा.
देशातील कोणत्याही नागरिकांची कोणत्याही प्रकारच्या ग्राहकांच्या स्वरूपात फसवणूक होते, तर कृपया न्यायासाठी संपर्क साधावा. राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग, केंद्र सरकारची वेबसाइट :- ई-मेल आयडी :-संपर्क क्रमांक :- 01124608801. देशातील सर्व जिल्हास्तरीय ग्राहक फोरमची लिस्टः- http://www.ncdrc.nic.in/districtlist.htm त्या लिंकवर मिळते आणि आपण आपल्या जिल्हय़ाच्या फोरमशी संपर्क साधू शकतो.
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत) वेबसाईटः- टोल फ्री क्रमांकः- 1800114000 किंवा 14404 वर संपर्क करावा. याच्या व्यतिरिक्त शासनाचे मोबाईल ऍपसुद्धा आहे किंवा मॅसेजद्वारेसुद्धा सेवा पुरविली जाते. राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र वेबसाईटः- हेल्पलाईन नंबरः- 022 40293000 ई-मेल आयडीः[email protected] यावर ग्राहक संपर्क करू शकतात.
‘जागो ग्राहक जागो’ वेबसाईटः-http://www.jagograhakjago.com/टोल फ्री क्रमांकः- 1800114424 आणि ई-मेल आयडीः- [email protected] आहे. कॉन्फोनेट (देशातील ग्राहक मंचाचे संगणकीकरण आणि नेटवार्ंकग):- w.cms.nic.in ऑनलाइन साईटवर ग्राहकसंबंधित सर्व केसेसची अपडेट माहिती मिळते.
आपण ग्राहक म्हणून जागरूक असणे खूपच गरजेचे आहे आणि यासाठीच शासनाने ग्राहकांच्या हक्क संरक्षणाकरिता कायदे तयार केले आहेत. अनेक संस्था, परिषद, मंच/फोरमसुद्धा स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ग्राहकांच्या हक्कांसाठी काम करतात.
वस्तू घेताना किंमत, वस्तू निर्मितीची व समाप्तीची तारीख, अटी व नियम, वस्तू निर्मितीतील सामग्री, वजन व इतर गोष्टी काळजीपूर्वक निरखून बघावे. प्रत्येक वस्तू स्वस्त असेल म्हणून ती निकृष्ट दर्जाचे असेल असे नसते आणि महाग असेल म्हणजे चांगलीच असेल असेही नसते. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे जेनेरिक औषधी आहे. म्हणून फक्त पैशाच्या किमतीवरूनच वस्तूचा दर्जा ओळखू नये. जागरूक व्हा आणि एक जबाबदार ग्राहक बना.




























































