
लातूरमधील चाकूर येथे मोटारसायकलवरुन जाणाऱ्या व्यक्तीला अडवून डोक्याला खेळण्यातील पिस्तूल लावत लूटण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी एकाविरुध्द चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात पपण शंकर कांबळे (रा. सिध्दार्थ नगर, चाकूर) याने दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, 7 जानेवारी रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार चाकूर बसस्थानकाच्या बाजूने मोटारसायकलवरुन जात असताना अचानक एक अनोळखी इसम मोटारसायकल समोर आला. त्याने तक्रारदारांना अडवले आणि त्याच्या जवळील पिस्तूल कानपट्टीला लावून तुझ्याकडे किती पैसे आहेत ते दे म्हणून धमकावले.
आपला कुठलाही व्यवहार नाही असे म्हटले असता तुला ठार मारतो असे सांगत धमकी दिली. भांडणाचा आवाज एकल्यावर काहीजण तिथे धावत आले. त्यामुळे त्या व्यक्तीने पोबारा केला. त्याच्याजवळील पिस्तूल खेळण्यातील होते, असे तक्रारदारांनी सांगितले. तिथे आलेल्या लोकांनी आरोपीचे नाव मंगेश उस्तूर्गे असल्याचे सांगितले. या तक्रारीवरुन चाकूर पोलीस ठाण्यात मंगेश उस्तूर्गे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























































