
हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे चौथा कसोटी सामना रंगणार आहे. पण क्विन्सलॅण्ड येथील सरकारकडून कोरोनासंबंधित कडक नियमाचा अवलंब करण्यात आला आहे. आयपीएलपासून ‘बायोबबल’मध्ये राहणाऱ्या टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी मात्र याला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयकडून क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे पत्राद्वारे टीम इंडियाच्या खेळाडूंना ब्रिस्बेन कसोटीदरम्यान सूट द्या, अशी मागणी करण्यात आली आहे.
एकाच मजल्यावरील खेळाडूंना मुभा
क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून मात्र स्पष्टपणे सांगण्यात आले की, हॉटेलमधील एका मजल्यावर राहणाऱ्या खेळाडूंना एकत्रितपणे वेळ घालवता येणार आहे. पण अन्य मजल्यावरील खेळाडू त्यांच्याशिवाय इतर मजल्यावर जाऊ शकत नाहीत.
एकत्र बैठका, जेवण करायला द्यावे
हिंदुस्थानी संघातील खेळाडूंना ‘हॉटेल-स्टेडियम-हॉटेल’पर्यंत मर्यादित ठेवता कामा नये, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. बीसीसीआयने पत्रात म्हटले की, आयपीएलप्रमाणेच ब्रिस्बेन कसोटीसाठी सूट देण्यात यावी. हॉटेलमध्ये खेळाडूंना एकत्र राहण्याची मुभा द्यावी. त्यांना एकत्रितपणे जेवण करायला द्यावे. बैठकांसाठी एकत्र येण्यास द्यावे.

























































