
विधी (लॉ) अभ्यासक्रमाच्या परीक्षा झाल्या. मेरीट लागली. त्यानंतर महाविद्यालये निवडण्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जही केले. कॅप राऊंडसाठी त्यांना त्यांची कागदपत्रे अपलोड करण्यास सीईटी सेलने सांगितले. त्याबरोबर व्हेरिफिकेशनसाठी सीईटी परीक्षेला भरलेला अर्जही अपलोड करायला सांगितला. परंतु अर्जाचे एकच पान अपलोड होत असून सीईटीच्या साईटवर ‘एडिट’चा पर्यायही ओपन होत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत.
लॉ स्टुडंट्स कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. सचिन पवार यांना विद्यार्थ्यांनी ही परिस्थिती अवगत करून दिली. त्यांनी स्वतः त्याची शहानिशा केली. त्या वेळी असे दिसून आले की, सीईटी अर्जाचे एकच पान अपलोड होत आहे. इतर पाने अपलोड न होता केंडिंग अशी येत आहेत. ‘एडिट’चा पर्यायही ओपन होत नसल्याने आवश्यक ती दुरुस्तीच करता येणार नाही, असे अॅड. पवार यांचे म्हणणे आहे.
10 जानेवारी ही दुरुस्तीची अखेरची मुदत आहे. तत्पूर्वी दुरुस्ती करता न आल्यास विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द ठरणार आहेत. सीईटी सेलशी यासंदर्भात विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सेलमधील सर्वच फोन बंद होते.
सीईटी सेलने विद्यार्थ्यांना दुरुस्तीसाठी मुदतवाढ द्यावी आणि साईटवर ‘एडिट’चा पर्याय खुला करावा अशी मागणी अॅड. पवार यांनी केली आहे. सीईटी सेलने ही सॉफ्टवेअरची तांत्रिक चूक असल्याचे सांगून हात झटकले आहेत.
‘गेट 2021’ परीक्षेची प्रवेशपत्रे ‘गो अॅप्स’वर
आयआयटी व आयआयएससी संस्थांमध्ये इंजिनीयरिंग अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया ‘गेट 2021’ परीक्षेची प्रवेशपत्रे ‘गो अॅप्स’ पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती आयआयटी मुंबईच्या वतीने देण्यात आली.
यंदा ही परीक्षा आयआयटी मुंबईच्या वतीने घेण्यात येणार आहे. सी-डॅकचा वापर करून गेट 2021 परीक्षेची 9 लाख 13 हजार 272 प्रवेशपत्रे बनवण्यात आली आहेत. येत्या 5 ते 7 फेब्रुवारी आणि 12 ते 14 फेब्रुवारी दरम्यान देशातील 200 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.




























































