
थर्टीफर्स्टच्या रात्री खार येथे जान्हवी कुकरेजा हिची तिच्या मित्रांनी हत्या केली. मात्र त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शी पुरावे उपलब्ध नसल्याने जान्हवीची हत्या कशी झाली असेल ते जाणून घेण्यासाठी पोलिसांनी आज त्या घटनेचा क्राइम सीन करून पाहिला. यावेळी दोन्ही आरोपी, फॉरेन्सिक एक्सपर्ट, श्वान पथक उपस्थित होते. या क्राइम सीनची व्हिडीओग्राफी करण्यात आली.
खार येथील 14 व्या रस्त्यावर असलेल्या भगवती हाईटस या इमारतीच्या गच्चीवर जान्हवी तिचा मित्र श्री आणि मैत्रीण दिया यांनी अन्य मित्रांसोबत थर्टीफर्स्टच्या रात्री पार्टी केली. त्यावेळी तिघांमध्ये काहीतरी बिनसले आणि श्री व दियाने मिळून जान्हवीला दुसऱया मजल्यावरून खाली फेकून दिले. त्यावेळी तिघेही दारूच्या नशेत तर्रर होते. खाली पडल्याने जान्हवीचा मृत्यू झाला. खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून श्री आणि दिया या दोघांना अटक केली.
मात्र या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने वस्तुस्थितीजन्य पुरावे आणि फॉरेन्सिक अहवालावर सर्व अवलंबून आहे. त्यामुळे पोलिसांनी जान्हवीची हत्या कशी झाली असेल ते जाणून घेण्यासाठी त्याच ठिकाणी आज क्राइम सीन करून पाहिला. यावेळी श्री आणि दिया तसेच पाच फॉरेन्सिक एक्सपर्टचे पथक, श्वान पथक, व्हिडीओग्राफर्स यांच्या उपस्थित पुतळ्याच्या सहाय्याने जान्हवीला ढकलून दिल्यानंतर ती कशी पडली असेल ते जाणून घेण्यात आले.
दरम्यान, पोलीस दोन्ही आरोपीं तसेच पार्टीत उपस्थित अन्य तरुणांच्या वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. त्यावेळी आरोपी तसेच अन्य तरुणांनी ड्रग्जची नशा केली असावी, असा पोलिसांना दाट संशय आहे. जर वैद्यकीय अहवालात तसे स्पष्ट झाले तर गुन्ह्याचा तपास ड्रग्जच्या दिशेने देखील केला जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले. घटनेवेळी श्रीच्या बरगडय़ांना दुखापत झाली होती. मात्र आता उपचारांती त्याला सोडून देण्यात आल्याने पोलीस त्याची चौकशी करणार आहेत.




























































