
एकदा का कोणती गोष्ट मनावर घेतली की काहीही अशक्य नसतं. याचा प्रत्यय ओडिशा येथील शेतकऱ्याने करून दिलाय. शेतात पाणी येत नाही. सरकारी कार्यालयात खेटे घालूनही काही होत नाही, यामुळे शेतकऱ्याने असा काही देशी जुगाड केलाय की तो बघून भलेभले तोंडात बोटं घालतील. शेतकऱ्याने बांबूच्या काठ्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांपासून स्वतची सिंचन व्यवस्था उभी केली आहे.
महर टिपरिया असे शेतकऱ्याचे नाव असन तो मयूरभंज जिल्ह्यात राहतो. दोन किलोमीटर लांब शेतात पाणी घेऊन जाण्यासाठी पवनचक्कीसारखं लाकडी यंत्र तयार केलं. त्याच्या मदतीने पाणी थेट शेतापर्यंत नेलं. एका लोखंडी वर्तुळात प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांचा मागच्या बाजूला भाग कापून जोडला. बाटल्यांचा मागचा भाग कापल्याने त्या कप किंवा मगासारख्या दिसतात. त्यामध्ये नदीचे पाणी भरले जाते. आणि ते पुन्हा लाकडाच्या पाईपमध्ये सोडले जाते.
चक्राला 30 ते 40 बाटल्या लावल्या आहेत. चक्र जसजसं फिरतं तसं बाटल्यांमध्ये पाणी भरलं जातं आणि ते पाईपच्या सहाय्याने शेतापर्यंत पोचवलं जातं. अशा तर्हेने दोन किमी दूरवरच्या शेतात पाणी पोचवण्यात यशस्वी झाला आहे. महूरने लढवलेली शक्कल बघण्यासाठी गावकरी गर्दी करत आहेत.






















































