नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोणतेही सरकार असू दे खासदार नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलांपासूनच आहे. त्यांनी त्यांचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडू नये, अशा शब्दांत खासदार  विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केला आहे.

चिपळूण येथे पत्रकारांशी बोलताना विनायक राऊत यांनी नारायण राणे यांनी सुरक्षा कपातीवरून केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. माझी सुरक्षा काढून घेतल्याबद्दल कोणतीच तक्रार नाही. केंद्र सरकारने माझ्या सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे. पण माझ्या जिवाचे काही बरे -वाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार असेल, असे वक्तव्य केले होते. त्याकडे पत्रकारांनी खासदार विनायक राऊत यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, राणेंना दहशतवाद्यांपासून धोका नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सक्षम सरकार आहे. केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राणेंना त्यांच्या दोन मुलांपासून धोका आहे.

राजकारणात दोन्ही मुले यशस्वी ठरली नाहीत

राणेंचे राजकारणात वलय आहे. त्यांच्याबद्दल बोलताना आम्हीसुद्धा कधी एकेरी बोलत नाही. पण नीलेश राणेंची भाषा असभ्य असते. खरे तर राणेंच्या दोन्ही मुलांना राजकारणात यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व उपलब्ध होते. पण दोघांनाही त्याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला नाही. नीलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. नीलेश राणेला मतदारांनी घरी बसविले. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असे वाटले होते, परंतु त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना भविष्यात घरात बसवल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही विनायक राऊत यांनी लगावला.