ऑनलाईन बस आरक्षण करणे पडले महागात, महाबळेश्वरमधील जोडप्याला 58 हजार रुपयांचा गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑनलाइन व्यवहारातील निष्काळजीपणा एका जोडप्याला चांगलाच महागात पडला आहे. ऐन संक्रांतीच्या दिवशी एका चोरटय़ाने बस आरक्षणाच्या बहाण्याने जोडप्याला ऑनलाइनवरून तब्बल 58 हजार 200 रुपयांना गंडा घातला. याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

महाबळेश्वर तालुक्यातील मेट गुताड येथील कल्पेश मंगलदास बावळेकर हे नोकरीनिमित्त मुंबईला राहतात. आजीच्या अंत्यसंस्कारासाठी ते पत्नी प्राजक्ता हिला घेऊन गावी आले होते. पुन्हा मुंबईला जाण्यासाठी बस आरक्षण करण्यासाठी त्यांनी ‘रेड बस’ या ऑनलाइन बस आरक्षण करणाऱया कंपनीला फोन लावला.

फोनवर बोलणाऱया व्यक्तीने संभाषणानंतर कल्पेश यांना मोबाईलमध्ये ‘डेक्स ऍप्लिकेशन’ डाऊनलोड करा, असे सांगितले. कल्पेश यांनी मोबाईलमध्ये ‘डेक्स ऍप्लिकेशन’ डाऊनलोड केले. यामुळे कल्पेश यांच्या बँक खात्याची सर्व माहिती त्या व्यक्तीला मिळाली. त्याने कल्पेश यांच्या येस बँकेच्या खात्यातून प्रारंभी 1200 व त्यानंतर 57 हजार रुपये, असे एकूण 58 हजार 200 रुपये लांबविले.

बँक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज येताच फसवणूक झाल्याचे कल्पेश यांच्या लक्षात आले. कल्पेश व त्यांची पत्नी प्राजक्ता यांनी याबाबत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी फसवणुकीची माहिती सायबर सेल कक्षाला दिली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांनी दिली. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना गोपनीय माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.