
मुलुंडच्या केळकर शिक्षण संस्थेच्या साईंटिफीक रीसर्च सेंटर या वनस्पती जीवतंत्रज्ञान तसेच काँस्मेटाँलाँजी क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या संशोधन संस्थेचा रौप्यमहोत्सवी सोहळा अलिकडेच साजरा करण्यात आला.
सुगंधी द्रव्याची निर्मिती करणाऱया प्रसिद्ध केळकर कंपनीचे दिवंगत संचालक भाऊसाहेब केळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली साईंटिफिक रिसर्च ही संस्था सुगंधी वनस्पतीची लागवड व सुगंधी पदार्थाची निर्मिती व संशोधन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून मागील पंचवीस वर्षे कार्यरत आहे.
संस्थेच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यात केंद्र सरकारच्या जीवतंत्रज्ञान विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. अस्लम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच लखनऊ येथील सुगंधी व औषध वनस्पती संशोधन संस्थेचे माजी संचालक डॉ. अलोक कालरा व बंगळूरु येथील आयटीसी कंपनीतील प्रमुख शास्त्रज्ञ विजयन पद्मनाभन विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात संस्थेच्या विश्वस्त ज्योती भडकमकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. वझे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शर्मा या महाविद्यालयाच्या कार्याची माहिती दिली. रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सुरू केलेल्या अद्ययावत सेंटरचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त रमेश वझे यांच्या हस्ते करण्यात आले.






























































