देशात 40 हजार मेगावॅटचे ग्रीड कनेक्टेड रुफटॉप सौर प्रकल्प, वीज वितरण कंपन्या समन्वयाचे काम पाहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात पुढील दोन वर्षांत तब्बल 40 हजार मेगावॅट क्षमतेचे ग्रीड कनेक्टेड रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाने ठेवले आहे. त्यानुसार प्रकल्प उभारणीला प्रोत्साहन म्हणून सरकारकडून एकूण खर्चाच्या 40 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तसेच प्रकल्प उभारणसाठी नोडल एजन्सी म्हणून संबंधित राज्यातील वीज वितरण कंपन्या काम पाहणार आहेत.

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा विभागाच्या धोरणानुसार ग्रीड कनेक्टेड रुफटॉप सौर प्रकल्पातून तयार होणारी वीज ग्राहक स्वतः वापरून जेवढी वीज ग्रीडमध्ये टाकली जाईल त्याचे बिल त्यांना मिळणार आहे. तसेच प्रकल्प उभारणीसाठी तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पाला 40 टक्के तर त्यापुढे दहा किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांना 20 टक्के सबसिडी अपारंपरिक ऊर्जा विभागाकडून मिळणार आहे. ग्रीड कनेक्टेड रुफटॉप सोलरमधून वीजनिर्मिती सुरू झाल्यानंतर औष्णिक वीज प्रकल्पातील वीज निर्मिती कमी झाल्याने प्रदूषण घटणार आहे.

फसवणूक टाळण्यासाठी वीज वितरण कंपन्यांची मदत घ्यावी

ग्रीड कनेक्टेड सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी संबंधित राज्यातील वीज वितरण कंपन्यांनी प्रकल्प उभारणीच्या कामासाठी अधिपृत व्हेंडर निश्चित केलेले आहेत. तसेच प्रकल्प उभारणीचा खर्चही त्यांनी निश्चित केलेला आहे. मात्र सध्या अनेक कंपन्या आपणच अधिपृत व्हेंडर असल्याचे सांगून प्रकल्प उभारणाऱयांकडून अवाच्या सवा रक्कम वसूल करत आहेत. ही फसवणूक टाळण्यासाठी प्रकल्प उभारण्यास इच्छुक असलेल्यांनी वीज वितरण कंपन्यांकडे संपर्प साधावा, असे आवाहन अपारंपरिक ऊर्जा विभागाने केले आहे.