संगमनेर तालुक्यात भरदुपारी भीषण दरोडा; वृद्धेचा निर्घृण खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लुटीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी भरदुपारी घरात घुसून गळा दाबून एका वृद्ध महिलेचा खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर गावात दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दरोडेखोरांनी चार वर्षीय मुलीच्या कानातील सोन्याच्या रिंगा ओरबडल्याने ती जखमी झाली आहे. या मुलीने आरडाओरड केल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली असून, श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनीही तातडीने कौठेकमळेश्वर गाठले असून, दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी शर्थ केली जात आहे.

सावित्राबाई मोगल शेळके (वय 60) असे मृत वृद्धेचे नाव असून, ईश्वरी सोमनाथ भडांगे (वय 4) असे जखमी बालिकेचे नाव आहे.

कौठेकमळेश्वर गावाच्या सुरुवातीलाच असलेल्या एका घरात सावित्राबाई शेळके ही महिला एकटीच राहाते. घरातच तिचे छोटेखानी गोळ्या–बिस्किटांचे दुकान आहे. या महिलेला एकुलती एक मुलगी असून, ती अंभोरे येथे दिलेली आहे. आज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान सदर महिला घरात एकटीच असल्याची संधी साधून दरोडेखोरांनी तिच्या घरात प्रवेश केला. यावेळी तिने प्रतिकार करीत आरडाओरड करू नये म्हणून दरोडेखोरांनी तिचा गळा दाबून तिच्या गळ्यातील सर्व दागिने व कानातले ओरबाडून घेतले. मात्र, या प्रकारात श्वास गुदमरून त्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला.

हा प्रकार सुरू असतानाच त्या वृद्धेच्या घरापासून काही अंतरावर राहणारी ईश्वरी खाऊ आणण्यासाठी त्या महिलेच्या दुकानात गेली. दरोडेखोरांची नजर त्या लहानशा मुलीच्या कानातील सोन्याच्या डूलवर पडली. त्यांनी ते डूल कानासह ओरबाडले. त्यामुळे ईश्वरी रडत रडत तेथून पळतच आपल्या घरी परतली. तिची अवस्था पाहून तिच्या आई–वडिलांनी काय झाले म्हणून विचारले असता ती ‘फक्त… आजी…’ असे म्हणू लागल्याने त्या परिसरातील काहींनी शेळके यांच्या घरी जाऊन पाहिले असता शेळके यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.

घटनेची माहिती समजताच गावकऱयांनी दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी अख्खा परिसर पिंजून काढला. मात्र, दरोडेखोरांचा कोठेही पत्ता लागला नाही. संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक राहुल मदने, तालुका पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख आदीसह तालुका व शहर पोलिसांनी कौठेकमळेश्वरकडे धाव घेतली. सध्या घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱयांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही उपस्थित आहे.