बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशनला उद्योगवाढीसाठी मदतीचा हात देऊ – ऍड. अनिल परब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन या प्रसिद्ध उद्योजकीय संघटनेचा 57 वा पदग्रहण सोहळा नुकताच अंधेरीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला. महाराष्ट्र राज्याचे परिवहनमंत्री ऍड.अनिल परब हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. टॅलेण्टस्मिथ कन्सल्टींगचे संस्थापक व सीईओ डॉ.प्रमोद सदरजोशी हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहिले. यावेळी पिरॅमिड इंडस्ट्रीजचे सीईओ संजय शाह यांनी वर्ष 2021 चे बीआयएचे अध्यक्ष म्हणून पदग्रहण केले.

“व्यवसायवृद्धीसाठी आम्ही बॉम्वे इंडस्ट्रीज असोशिएशन सारख्या संस्थेला नेहमीच मदतीचा हात देऊ. तसेच उद्योग आणि सरकार या दोघांचा लाभ देखील शोधू. नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शाह हे माझे चांगले मित्र आहेत. पर्यायाने मी बीआयए संस्थेचा मित्र आहे आणि मैत्रीत मी नेहमी एक पाऊल पुढेच असेन,” असे परिवहनमंत्री ऍड. अनिल परब म्हणाले.

“शासनाच्या मदतीने महाराष्ट्रास उत्तम सुविधा असलेले जागतिक स्तरावरील उत्पादन केंद्र बनविणे हे आमचे उद्दीष्ट आहे. 2030 पर्यंत अनेक क्षेत्रात आपण चीनपेक्षा दर्जेदार आणि स्वस्त असे उत्पादन व सेवा निर्माण करु. हे ध्येय साध्य करण्यासाठी बीआयए डिजीटल पद्धतीने विक्री वाढवेल. तसेच केंद्र व राज्य शासनाने पुरविलेल्या जमिनी व इतर सुविधा यांच्या मदतीने दिल्ली-मुंबई ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर व मुंबई येथे जागातिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करु.” असे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय शाह म्हणाले.

1948 साली स्थापन झालेली बॉम्बे इंडस्ट्रीज असोसिएशन ही उद्योजकीय संघटना भारतातील जुन्या उद्योजकीय संघटनांपैकी एक मानली जाते. सोमवारी नवनिर्वाचित कार्यकारिणी समितीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला. पिरॅमिड इंडस्ट्रीजचे सीईओ संजय शाह यांनी वर्ष 2021 चे बीआयएचे अध्यक्ष म्हणून पद ग्रहण केले. अंत्रावेब टेक्नॉलॉजिसचे सहसंस्थापक नेव्हील संघवी आणि आशित कम्बाईनचे संचालक आशिष गांधी यांनी उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला. त्याचप्रमाणे कार्यकारिणीतील इतर सदस्यांचा देखील पदग्रहण सोहळा यावेळी पार पडला.