
कर्नाटकव्याप्त सीमाभाग हा आपलाच असल्याचा दावा जुलूम, दडपशाहीने कर्नाटक सरकार करीत आहे. मात्र त्यांचा हा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुराव्यांसह खोडून काढला आहे. बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक असलेला हा भूभाग महाराष्ट्राचाच असल्याचे शेकडो पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार माहिती व जनसंपर्क संचालनालयाने समोर आणले आहेत.
यू टय़ूबवर प्रसिद्ध करण्यात आलेली ‘अ केस फॉर जस्टिस’ ही ध्वनिचित्रफित पाहिल्यानंतर कर्नाटक सरकारचे दावे किती फोल आहेत याची प्रचितीच येते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकाने 50 वर्षांपूर्वी तयार केलेला ‘अ केस फॉर जस्टिस’ हा 35 मिनिटांचा लघूपट सर्वांना बघण्याचे निर्देश दिले. त्यानुसार माहिती व जनसंपर्क विभागाने जुन्या पद्धतीने रिळांवर चित्रित झालेल्या या लघुपटाला डिजिटल स्वरूप दिले आणि यू टयूबद्वारे कर्नाटकव्याप्त महाराष्ट्राची सत्य परिस्थिती जगासमोर आली.
हजारो फूट लांबीचा माहितीपट
सीमा भागातील लोकजीवन, व्यापारी आणि अन्य व्यवहार, रोजची भाषा, वृत्तपत्रांचा वापर, शाळा, देवळे, मठ, पोथ्या, मराठी गाणी, भजन/कीर्तने, नगरपालिका दस्तऐवज, व्यापारी चोपडय़ा, खतावणी, शीलालेख असे जवळपास हजारो फुटांची लांबी भरेल एवढे चित्रीकरण करुन तयार केलेला हा माहितीपट आहे. याशिवाय यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी सीमा प्रश्नासंदर्भात बैठका आणि सभांमधून केलेल्या भाषणांचे व्हिडीओ देखील आपण पाहू शकतो.
सीमाभागात शंभर-सवाशे वर्षांपासूनची मराठी संस्कृती
‘अ केस फॉर जस्टिस’ या लघुपटाद्वारे सीमा भागामधली शंभर-सवाशे वर्षांपूर्वीपासूनची मराठी संस्कृतीच एकामागोमाग एक समोर येते. ‘घडली माला अश्रू फुलांची’ या सामाजिक नाटकाचा नोव्हेंबर 1970 मधला मराठीतला फलक, 1939 मधील स्थापन झालेल्या कारवारच्या मराठी महिला मंडळाची बैठक, तत्कालीन म्हैसूर राज्यातील नामांकित नेते आनंद नाडकर्णी यांचे 1912 मधील मराठीतले दत्तक पत्र, कानडा जिह्यातील 1960 मधील पहिले मराठी वृत्तपत्र, 1890 मधला बेळगाव म्युनिसिपालटीने बांधलेल्या पुलावरील मराठीतील शिलाफलक, कोळी पुरुष आणि महिलांची त्या काळाची महाराष्ट्रीय वेशभूषा हे सर्वच मराठी असल्याचे पाहून कर्नाटकचा दावा किती चुकीचा आहे हे स्पष्ट होते.
































































