
मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी एकुण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडय़ास या बैठकीत मंजूरी देण्यात आली. पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनांसाठी 319.36 कोटी रुपये, समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत 51.14 कोटी रुपये तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी 5.59 कोटी रुपये अशा एकुण 376.09 कोटी रुपयांच्या प्रारुप आराखडय़ास मंजुरी देण्यात आली. सन 2021-22 या वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत नगर विकास (सौंदर्यीकरण), गृह निर्माण (संरक्षण भिंत), ऊर्जा, शिक्षण, परिवहन, पर्यटन, शासकीय कार्यालय क प्रशासकीय इमारती इत्यादी विविध योजनांसाठी 123.88 कोटी रुपयांचा नियतव्यय वाढवून मिळण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत मागणी करण्यात येईल, असे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला उद्योग मंत्री सुभाष देसाई, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ऍड. अनिल परब, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, कौशल्य विकास विभागाच्या सचिक अंशु सिन्हा, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, अश्विनी भिडे, मिलींद बोरीकर आदी उपस्थित होते.

























































