
‘मागच्या आठवड्यात तू मला खुन्नस का दिली होतीस’ असा जाब विचारून तीन जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास येरवडा परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ घडली.
येरवडा पोलिसांनी अभय चंद्रकांत जंगले (वय 18), निहाल विशाल माचरे (वय 19) या दोघांला अटक केली आहे. तर आदित्य घमरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तेजस नितीन धुमाळ (वय 18) यांनी तक्रार दाखल केली आहे. तेजस बुधवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील शिवाजी पुतळ्यासमोर मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते.
त्यावेळी तिथे आलेल्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ केली. आरोपी अभय जंगले याने ‘तुला खूप मस्ती आली आहे, मला गेल्या आठवड्यात तू खुन्नस का दिली होती’ अशी विचारणा करत तेजसला ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर वार केले. त्यामुळे तेजस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी येरवडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
































































