राष्ट्रध्वजाचा अपमान दुर्दैवी; अर्थसंकल्पीय अभिभाषणात राष्ट्रपती कोविंद यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान ही दुर्दैवी घटना आहे. जे संविधान सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते, अभिव्यक्तीचा सन्मान करते, तेच संविधान आपल्याला कायदा आणि नियमांचे पालन करायलाही सांगते, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अभिभाषणात केले. नवीन कृषी कायदे फायद्याचे असल्याचेही ते म्हणाले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी सुरू झाले. अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींनी अभिभाषणात नवीन कृषी कायद्यांचे स्वागत केले. कृषी कायद्यांतील सुधारणांना अनेक राजकीय पक्षांनी वेळोवेळी पाठिंबा दिला होता. या कायद्यांची 20 वर्षांपासून मागणी होत होती. सर्वोच्च न्यायालयाने सध्या या कायद्यांना स्थगिती दिली आहे. मात्र पुढे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करूनच या कायद्यांची अंमलबजावणी करेल, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाने देशाचे कृषी क्षेत्र आणखी मजबूत बनेल. सरकारने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करून उत्पादन खर्चाच्या दीडपटीने हमीभाव वाढला आहे, असे त्यांनी सांगितले. गलवान खोऱयात शहीद झालेल्या 20 जवानांच्या बलिदानाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे, असेही राष्ट्रपती म्हणाले.