पालिकेची जम्बो कोविड सेंटर मार्चपर्यंत सुरू राहणार, मुंबईत 517 पैकी फक्त 39 कोरोना केअर सेंटर सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी लोकल सुरू होत असल्यामुळे खबरदारी म्हणून पालिका जम्बो कोविड केअर सेंटर मार्चपर्यंत सुरूच ठेवणार आहे. याशिवाय कोविड रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेली काही कोरोना केअर सेंटर आवश्यकतेनुसार सुरूच राहणार आहेत. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, मुंबईत सद्यस्थितीत कोरोना नियंत्रणात आल्यामुळे पालिकेने सुरू केलेल्या एकूण 517 पैकी केवळ 39 कोरोना हेल्थ सेंटर सुरू आहेत.

मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच संपूर्ण शहरात अनेक हॉटस्पॉट निर्माण झाले. त्यामुळे पालिकेच्या मोठय़ा रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली. शिवाय खासगी रुग्णालयांतील 80 टक्के खाटाही ताब्यात घेऊन कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिल्या. मात्र कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतच गेल्याने पालिकेने सात जम्बो कोविड सेंटरसह लक्षणे असलेल्या ‘कोरोना केअर सेंटर-2’ (सीसीसी-1) आणि लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘कोरोना केअर सेंटर-1’ मध्ये रुग्ण-संशयितांची व्यवस्था करावी लागली. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून सुरू झालेल्या कोरोना आता चांगलाच आटोक्यात आल्याने टप्प्याटप्प्याने कोरोना केअर सेंटरही बंद करण्यात येत आहे.

अशी आहे सद्यस्थिती

मुंबईत एकूण 517 कोरोना कोविड सेंटर सुरू केली. यामध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या (सीसीसी-1) 336 ‘बफर’ प्रकारातील म्हणजे दोन दिवसांत सुरू करता येतील अशा स्थितीत 22 सेंटर तैनात आहेत. तर रिझर्व्ह प्रकारात म्हणजेच आठ दिवसांत सुरू करता येतील अशा स्थितीत 287 सेंटर तैनात ठेवण्यात आली आहेत. तर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी (सीसीसी-2) सेंटरमधील एकूण 181 पैकी ‘बफर’ प्रकारात 24 आणि रिझर्व्हमध्ये 144 सेंटर आहेत.

ही जम्बो कोविड सेंटर सुरू राहणार

  • दहिसर जम्बो कोविड सेंटर
  • गोरेगाव नेस्को कोविड सेंटर
  • बीकेसी कोविड सेंटर
  • वरळी एनएससीआय कोविड सेंटर
  • मुलुंड कोविड जम्बो कोविड सेंटर
  • रिचर्ड्सन अॅण्ड क्रुडास कोविड सेंटर