बारवांचा शोध घेण्यासाठी मुंबईचा रोहन काळे जालन्यात फिरतोय रानोमाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र बारव मोहिम अंतर्गत मुंबईचा रोहन काळे मोटारसायकलवर जालना जिल्ह्याचा रानोमाळ फिरत आहे.  मुंबईच्या या अवलियाने आतापर्यंत दुर्लक्षित अशा 400 बारवा शोधल्या असून मराठवाड्यातील विविध बारवा शोधण्यासाठी त्याने लोणगाव वाघरुळला भेटी दिल्या आहेत.

महेश्वर, खंडवा, मलकापुर, जालना, पंढरपूर हा जुना पालखी मार्ग असुन यावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अनेक बारवा बांधलेल्या आहेत. यातील अनेक बारवांचा वापर वारकरी वारीदरम्यान करीत असतात. त्यापैकीच वाघु्रळ,इंदेवाडी, अंबड येथील बारवा आहेत.

जालना जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तुचा अभ्यास करणारे रामभाऊ लांडे आणि रोहन काळे यांनी अंबड व घनसावंगी तालुक्यातील तब्बल 20 बारवांना प्रत्यक्ष भेटी देवुन त्याच्या नोंदी केल्या आहेत. तिर्थपुरी येथील लक्ष्मीनारायण मंदिरातील बारव, तिर्थपुरीकरांनी स्वच्छ ठेवल्याचे पाहून रोहन काळे यांनी आनंद व्यक्त केला.

राज्यातील एक हजार बारवांना भेटी देत त्याचे डाँक्युमेटेशन करण्यासाठी रोहन काळे यांनी कोकण, मुंबई, गोवा, पश्चिम महाराष्ट्र येथील बारवांना भेटी देऊन महाराष्ट्र बारव मोहीम अंतर्गत संवर्धनासाठी लोकांनी आपले जलस्त्रोताचे जतन करावे. यासाठी ही मोहीम सुरू केल्याचे रोहन काळे यांनी सांगितले. यावेळी तिर्थपुरीचे सरपंच शैलेंद्र पवार यांनी रोहन काळे यांचा तिर्थपुरी भेटी प्रसंगी सत्कार केला.