
नवरा दारु पिऊन मारहाण करतो, त्रास देतो म्हणुन आंध्रप्रदेशमधील आपले सासरचे छोटेसे गाव सोडून ती अल्पवयीन 3 चिमुरड्यांसह मुंबईला राहायला आाली. मुळच्या रत्नागिरीच्या मात्र कामानिमित्त मुंबईत राहणाऱ्या तरुणाशी तिचे सुत जुळले. नंतर लग्न करुन काही दिवस एकत्रित राहिली, मात्र नंतर कायमस्वरूपी गावाकडे रत्नागिरीला जायचा निर्णय दोघांनी घेतला. तीन अल्पवयीन मुलांसह दोघेजण रत्नागिरीत राहायला आले खरे परंतू आपल्या पूर्वीच्या पतीपासून झालेल्या मूलांना सांभाळणार कोण ? असा प्रश्न निर्माण झाल्याने रेल्वे स्टेशनवरच आपल्या पोटच्या तीन अल्पवयीन चिमुरडयांना उपाशीच सोडून ती नवऱ्यासह थेट नवऱ्याच्या घरी राहायला गेली.
इकडे रेल्वे स्टेशनवर भीक मागून लोकांनी दिलेल्या वडापाव खाऊन पोट शांत करणारी तीन निरागस चिमुरडी मात्र आईच्या मायेच्या पदरासाठी नि ओलाव्यासाठी आसूसलेली होती. कधी रेल्वे स्टेशन तर कधी शिवाजी स्टेडियम तर कधी बस स्टँड अशा ठिकाणी आसरा शोधत.. आईच्या येण्याची वाट पाहत होती
यावेळी एका विकृत माणसाची नजर या असहाय्य अल्पवयीन चिमुरडीवर गेली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. या संवेदनशील घटनेने संपूर्ण रत्नागिरी शहर हळहळले होते. रत्नागिरीचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक मा.गणेश इंगळे व रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन टीमच्या मदतीने आरोपीला 24तासांच्या आत अटक करून संपूर्ण तपास जलदगतीने पूर्ण केला. रत्नागिरीत काही महिन्यांपूर्वी स्वतंत्र विशेष पॉक्सो न्यायालय सुरु झाले आणि या केसचा निकालही वर्षभरात लागला. दोषी नराधमाला तब्बल 20 वर्ष सश्रम कारावासाची आरोपीला शिक्षा झाली. मात्र अद्याप आईवडीलांना त्यांच्या कृत्याची/गुन्हयाची शिक्षा व्हायची बाकी आहे.































































