
कोरोनाच्या वेळी हॉटस्पॉट बनलेली आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतून आता कोरोनाची हकालपट्टी सुरू असून धारावीत आज पाचव्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीपाठोपाठ दादरमध्येही आज चौथ्यांदा एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. धारावीत सध्या 14 तर दादरमध्ये 83 सक्रिय रुग्ण आहेत.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत 1 एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 8 लाखांच्या दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनली होती. मात्र, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्यात आला.
ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या 4 टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झीरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले आहे. त्यामुळे धारावीत 24 डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा, 22 जानेवारी 2021ला दुसऱयांदा, 26 जानेवारीला तिसऱयांदा, 27 जानेवारीला चौथ्यांदा तर आज धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही.
दादर गिरवतोय धारावीचा कित्ता
कोरोनाला हरवण्याचा धारावीचा कित्ता दादरने गिरवायला सुरुवात केली आहे. दादरमध्येही 26 डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा तर 21 जानेवारीला दुसऱयांदा, 27 जानेवारीला तिसऱयांदा तर आज चौथ्यांदा दादरमध्ये शून्य रुग्ण आढळून आले. दादरमध्ये आतापर्यंत 4923 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 4667 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 83 सक्रिय रुग्ण आहेत. माहीममध्ये आतापर्यंत 4783 रुग्ण आढळून आले असून 4517 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 122 सक्रिय रुग्ण आहेत.






























































