
रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी फेटाळून लावला आहे. याआधीही जिल्हा न्यायालयात बोठेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.
रेखा जरे खून प्रकरणाला आता साठ दिवस उलटून गेलेले आहेत. फरार आरोपीचा शोध लागलेला नाही. या प्रकरणात पत्रकार बाळ बोठे हा मुख्य आरोपी आहे. नगर येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर बोठे याने 31 डिसेंबर 2020 रोजी खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आज या अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली होती. तपासी अधिकारी अजित पाटील हेसुद्धा यावेळी उपस्थित होते.
आरोपीच्या वतीने ऍड. जाधवर यांनी युक्तिवाद केला. सागर भिंगारदिवे हा या घटनेतील आरोपी असून, त्याच्याविरुद्ध पत्रकार बोठे याने बातमी छापली होती. त्या रागातून त्याने बोठेचे नाव घेतले आहे. तसेच, जरे यांच्याशी आमचे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे त्यांच्यात व आमच्यात फोन कॉल्स झाले. जरे यांना मारण्याच्या उद्देशाबाबत कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही, असा दावा आरोपीच्या वतीने त्याच्या वकिलांनी केला.
सरकार पक्षाच्या वतीने ऍड. बडाख यांनी युक्तिवाद केला. भिंगारदिवे व बोठे यांच्यात बातमी छापण्यावरून वाद असले, तरी ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. तसेच, रेखा जरे यांच्याशी बोठेचे 30 रोजी संभाषण झाल्याचे फोन हा पुरावा पोलिसांकडे आहे. त्यादिवशी जरे यांच्याशी झालेले फोन तसेच सीसीटीव्ही फुटेज, पेन ड्राइव्ह व अन्य तांत्रिक पुरावे पोलिसांकडे आहेत. पोलिसांकडे भक्कम पुरावे असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळत असल्याचे जाहीर केले.



























































