
वारसास्थळ जतन समितीची 13वी बैठक सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या बैठकीतच महाबळेश्वरच्या बाजारपेठेतील सुशोभीकरणाबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष लागून राहीले आहे. सातारा, महाबळेश्वर, पाचगणी व वाई नगरपरिषद तसेच महाबळेश्वर व पाचगणी प्रादेशिक योजना क्षेत्रातील वारसास्थळांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी शासनाने वारसास्थळ जतन समिती गठीत केली आहे. या वारसास्थळ जतन समितीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी होत आहे. या बैठकीत महाबळेश्वर, पाचगणी, वाई व सातारा येथील वारसास्थळांना धक्का न लागता या शहरांचा विकास करण्याबाबत प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे.
महाबळेश्वर येथील प्रमुख बाजारपेठेचे सुशोभीकरण करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. कारण, या सुशोभीकरणाच्या आराखडय़ात छत्रपती शिवाजी महाराज चौक व सुभाष चौकाचे सुशोभीकरण, बाजारपेठेतील रस्त्याचे रुंदीकरण, डॉ. साबने रोडवरील मिळकतींच्या समोरील दोन ते चार फूट दर्शनी भाग घेऊन त्या ठिकाणी फुटपाथ तयार करणे अथवा त्या ठिकाणी वृक्षलागवड करणे, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था करणे. त्या अनुषंगाने इतर सुशोभीकरणाची कामे करणे याबाबत प्रामुख्याने चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे. त्यानंतरच बाजारपेठेच्या सुशोभीकरणाच्या आराखडय़ाची तातडीने अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे.
महाबळेश्वर शहराचे भविष्य घडविणारा विकास आराखडा प्रशासनाने तयार केला आहे. या आराखडय़ाला विरोध करायचा, की आराखडय़ाच्या बाजूने कौल द्यायचा, या संभ्रमात महाबळेश्वरकर आहेत. या पार्श्वभूमीवर होत असलेली वारसास्थळ जतन समितीची होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
वेण्णालेक सुशोभीकरणासह इतर विषयांवर चर्चा होणार
बाजारपेठेप्रमाणेच या बैठकीत वेण्णालेक सुशोभीकरण, पेटीट ग्रंथालयाचे नूतनीकरण, पौलो मैदानाचा विकास, ब्रिटिशकालीन माउंट मालकम ही हेरिटेज वास्तू हेरिटेज यादीतून वगळणे, महाबळेश्वर येथील हेरिटेज व हिस्टोरिक टेल्स ऍण्ड राइड्स यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत चर्चा करणे, ऍव्हानो बंगला या शासकीय भाडेपट्टा मिळकतीमधील बांधकामाला परवानगी देण्याबाबत निर्णय घेणे आदी प्रमुख विषयांवर चर्चा करून या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहेत.
मालकम बंगल्यावरून पालिका-समितीत सामना रंगणार
महाबळेश्वर पालिकेचा विरोध डावलून वारसास्थळ जतन समितीने येथील मालकम बंगला हेरिटेज यादीतून वगळण्याचा विषय सातारा येथे 4 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या बैठकीत घेतला आहे. त्यामुळे भविष्यात पालिका व वारसास्थळ जतन समिती असा सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. वारसास्थळांचे जतन व संवर्धन करण्यासाठी ही समिती नेमली आहे, की वारसास्थळे पाडून त्या ठिकाणी नवीन बांधकामांना परवानगी देण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे, असा प्रश्न आता केला जात आहे.


























































