धारावीत कोरोनामुक्तीचा षटकार, सलग सहाव्यांदा एकही रुग्ण नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या वेळी हॉटस्पॉट बनलेली आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीतून आता कोरोनाची हकालपट्टी सुरू असून धारावीत आज सहाव्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. धारावीपाठोपाठ माहीममध्येही आज दुसऱ्यांदा एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. धारावीत सध्या 16 तर माहीममध्ये 117 सक्रीय रुग्ण आहेत.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत 1 एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण सापडायला सुरुवात झाली. कोरोनाने शिरकाव केल्यानंतर 8 लाखांच्या दाटीवाटीने वसलेल्या धारावीला कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक होण्याचा धोका होता. रुग्णसंख्या वाढू लागल्याने एका वेळी धारावी ‘कोरोना हॉटस्पॉट’ बनली होती. मात्र, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कोरोना रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्यात आला.

ट्रेसिंग, ट्रकिंग, टेस्टिंग आणि ट्रिटिंग या 4 टी मॉडेल, धारावी पॅटर्न, मिशन झिरो आणि धारावीकरांनी दिलेली साथ यामुळे धारावीत कोरोनाचा प्रसार रोखण्यात पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाला यश आले आहे. माहिममध्ये आतापर्यंत 4791 रुग्ण आढळून आले असून 4530 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 117 सक्रिय रुग्ण आहेत.

धारावीत 24 डिसेंबर 2020 मध्ये पहिल्यांदा, 22 जानेवारी 2021 ला दुसऱ्यांदा, 26 जानेवारीला तिसऱ्यांदा, 27 जानेवारीला चौथ्यांदा तर 31 जानेवारीला पाचव्यांदा आणि आज सहाव्यांदा धारावीत एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दरम्यान, माहीममध्ये आज दुसऱ्यांदा कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही.